आपला जिल्हा

पानिपतचे रणझुंजार श्रीमंत मराठा सरदार यशवंतराव पवार अन् अटकेपार योध्दा श्रीमंत राघोबादादा पेशवा

पानिपतचे रणझुंजार श्रीमंत मराठा सरदार यशवंतराव पवार अन् अटकेपार योध्दा श्रीमंत राघोबादादा पेशवा

गोदातीरावरील कोपरगांव शूरवीरांच्या वास्तव्य राहिलेली ऐतिहासिक नगरी.

कोपरगाव विजय कापसे दि १४ जानेवारी २०२५पानिपतच्या रणभूमीवर मकरसंक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारी १७६१ रोजी मराठा आणि अब्दाली यांच्यात घनघोर युद्ध झाले.अफगाणिस्थान वरून बलाढ्या सैन्य घेवून हिंदूस्थानवर आक्रमण करून आलेला अहमद शहा अब्दालीला पानिपत येथे सन १७६१ च्या तिसऱ्या लढाईत ‘श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवा’ यांचे नेतृत्वाखाली अफगाण सैन्याला मराठा साम्राज्याच्या शूरवीर सैन्याने कडवी झुंज दिली.

जाहिरात आत्मा

विश्वासराव पेशवा,भाऊसाहेब पेशवा,सरदार यशवंतराव पवार,बळवंतराव मेहेंदळे,नाना पुरंदरे,हरी शिवराम खासगीवाले,विठ्ठल शिवदेव,अंताजी माणकेश्वर, मानाजी पायगुडे, सुभानराव माने, खंडेराव नाईक निंबाळकर, इब्राहिमखान गारदी ,जनकोजी शिंदे, राणोजीराव भोईटे, साबाजी शिंदे, सिधोजीराव घारगे,समशेर बहादूर या प्रमुख सरदारांसह मराठा सैनिक पानिपतच्या रणसंग्रामात सहभागी झाले होते.
मराठा साम्राज्यासाठी प्राणपणाने लढतांना या कडव्याझुंजीत विश्वासराव पेशवा,सरदार यशवंतराव पवार सह मराठा सरदार व असंख्य सैनिक शहीद झाले.पानिपतच्या युध्दात झालेल्या घनघोर लढाईत पेशव्यांसोबत पवार सरदार सैन्याची कामगिरी पहावयास मिळते.
गोदावरी नदी काठावर वसलेले दक्षिणकाशी कोपरगाव नगरीत १७ शतकात पेशवा व पवारांचे वास्तव्य राहिले आहे.त्यांच्या साम्राज्याच्या खुणा आजही पहावयास मिळतात. १३व्या शतकात हा परिसर देवगिरीचा यादव राजा रामचंद्र राय यांचे ताब्यात होता.त्यानंतर येथे बहामनी राज्य आले. पुढे निजामशाही आणि मोगलांनी मराठवाडा हद्दीत आपलं वर्चस्व गाजवलं.

जाहिरात

रघुनाथराव उर्फ राघोबादादा म्हणजेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे सुपुत्र. प्रचंड महापराक्रमी पण तितकेच शीघ्रकोपी. मराठ्यांचा अटकेपार झेंडा पोहचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अफगाणिस्तानचा सुलतान अहमदशाह अब्दालीचा लेक तैमूर शाह दुर्राणी याला लाहोर मधून पळवून लावलं. शिंदे, होळकर यांच्या सेनेसह अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेला पेशावरसुद्धा जिंकला. रघुनाथराव पेशवे आणि मराठा सेनेची धडकी अफगाण सैन्याला देखील बसली होती. रघुनाथराव तथा राघोबादादा पेशवे यांनी अटकेपार मराठा साम्राज्याचे जरीपटका निशाण रोवले.

जाहिरात

राघोभरारी पेशावरच्या पुढे पर्यंत देखील पोहचली असती पण रघुनाथराव पुण्याच्या राजकारणाच्या ओढीने आतातायीपणे परतले.१७८२ मध्ये श्रीमंत थोरले माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यात पेशवाईच्या पदावरून एकदा संघर्ष पेटला. त्यानंतर राघोबादादांनी कोपरगांव येथील बेटात उंच चौथरा तयार करून भव्य असा वाडा बांधला.श्रीमंत नारायण पेशवेंच्या मृत्यूनंतर पेशवाईचा इतिहास बदलला. राघोबा आणि आनंदीबाईंना न्यायासनापुढे उभं केलं गेलं. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी राघोबादादांना देहांत प्रायश्चित ही शिक्षा ठोठावली. तर आनंदीबाईंना कोपरगांव इथं नजरकैदेत ठेवलं तर राघोबादादांची देहान्ताची शिक्षा प्रत्यक्षात झाली नाही. पण नंतर त्यांनाही कोपरगावच्या वाड्यात नजरकैदैत ठेवण्यात आले.न्यायशास्री रामशास्त्री प्रभुणे यांचे देहांत प्रायश्चित नंतर राघोबादादाने श्रीमंत पवार सरकार संस्थानच्या धारच्या किल्ल्याचा आसरा घेतला. तेथेच दुसऱ्या बाजीरावाचा जन्म झाला.

जाहिरात

राघोबादादांनी आयुष्याचा उत्तरार्ध गोदातीर जवळील कोपरगाव-बेट येथील वाड्यात व्यतित केला. पवित्र गोदावरी स्नानाला पापक्षालन करणारी नदी म्हणून पौराणिक ग्रंथ आणि हिंदू धर्म शास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे.राघोबादादाने देहांत प्रायश्चित्त अखेरचा काळ गोदावरी नदी तीरावरच्या बेट-कोपरगांव येथील वाड्यात व्यतित केला. बेट-कोपरगांवातील वाडा पेशवाईला शोभेल असाच देखणा होता. गोदावरी तीरावर २० फूट उंचीच्या चौथाऱ्यावर तो बांधलेला. वाड्यातल्या दिवाणखान्यातील छताचं नक्षीकाम डोळ्यांचे पारडं फिटणारं…वाड्यात दिवाणखाना, दरबारहॉल, स्त्री पुरुषांसाठी कोठीघर, मुदपाकखाना, नाटकशाळा, घोड्यांच्या पागा होता.
पेशव्यांचे बेट येथील वाडा (सद्यस्थितीत नामशेष), शहरातील वाडा,हिंगणी येथील अपुर्ण वाडा,बेट भागातील मंदिरांचा जिर्णोद्धार,घाटबांधणी अशा अनेक वास्तू आजही आहेत. हिंगणी येथे भव्य वाडा बांधून येथे मराठा साम्राज्याची उपराजधानी करण्याची त्यांची इच्छा होती.येथेच राघोबादादा यांना त्यांचे शेवटची इच्छेनुसार अग्नी देवून “स्मृती स्थळ” बांधले आहे.
धारानगरीतील परमारांचा महान क्षत्रिय राजा भोज होता.परमारांचे वंशज म्हणून पवार सांगतात. धार संस्थान हे हिंदुस्थानातील मध्य प्रदेश राज्यातील एक संस्थान आहे.आदिलशाहीच्या काळात शहाजीराजे भोसले यांचे सोबत साबुसिंग पवार होते.तेव्हापासून ‘भोसले आणि पवार’ या घराण्यांचे सख्य आहे.२२ जुलै १७३२ रोजी थोरल्या बाजीराव पेशव्याने आनंदराव पवाराला धार आणि आसपासच्या परगण्यांचा हक्क दिला.आनंदराव सर्पदंशाने मरण पावले (१७३६). त्यांचा सरंजाम मुलगा यशवंतराव यांजकडे आला. श्रीमंत पवार धार-देवास संस्थानात तुकोजी हा देवासच्या थोरल्या पातीचा संस्थापक असून जिवाजी धाकट्या पातीचा संस्थापक बनला.
बाजीरावाच्या दिल्लीवरील स्वारीत तुकोजी, जिवाजी व यशवंतराव यांनी त्यांजकडे सोपविलेली लढाईची कामे उत्तम रीतीने पार पाडली. वसईच्या रणसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. १७५२ मध्ये दिल्लीच्या बादशाहाशी मराठ्यांचा जो प्रसिद्ध अहदनामा (करारनामा) झाला, तो पेशव्यांतर्फे पाळला जाईल याची हमी शिंदे, होळकर व पवार या तिघांनी घेतली होती.
पानिपतच्या रणसंग्रामात मराठ्यांची रसद मारणारा अताईत खान हत्तीवर बसून पानिपतावर तिरंदाजी करत होता. सरदार यशवंतराव पवारांनी घोड्याला टाच दिली…अन् अताईतखानच्या हत्ती जवळ गेले.मराठ्यांच्या रसद मारणाऱ्या अताईतखानाला यशवंतरावांनी ललकारलं…हत्तीवर असणाऱ्या अताईखानने बाणाचा नेम यशवंतराव पवारांच्या वर धरला. बाणाचा रोख आपल्या वर पाहून यशवंतराव पवार कडाडले,”पवार हुं”. “मारुंगा तो चढके मारुंगां…”अन् एक क्षणात यशवंतराव घोड्यावरन अताईतखानच्या हत्तीवर चढून गेले. बाण रोखलेल्या निःश्वास झालेल्या अताईतखानाला काही कळायच्या आताच त्याच्या मस्तकार प्रहार झाला.
मूर्च्छा येऊन आंबरीत पडलेल्या अताईतखानच्या छाताडावर पाय देत यशवंतरावानी “हर हर महादेव”ची गर्जना केली. त्याचं छाटलेले मस्तक हातात घेऊन रणांगणावरचा प्रलयभैरव अंबारीत तांडव करू लागले…सरदार यशवंतराव पवार याच रणांगणात शौर्याने लढताना धारातीर्थी पडले. हे नुसतेच नावाचे “यशवंतराव” नव्हते तर उभी कारकीर्द “यशवंतराव” ह्या नावाला भुषण वाटावी अशीच दैदिप्यमान होती.अताईतखानच अवघ पथक अताईतखाना सहित मराठ्यांनीं मारलं. पण आज काळ मराठ्यांच्या वर भारी होता. “यशवंतराव पवार” उभं आयुष्य ज्या डामडौल मध्ये जगले. त्यांचा डामडौलाला शोभावा असा मृत्यू त्यांच्या भाळी होता. पानिपताच्या रणांगणावर लढून यशवंतरावाना आलेलं मरण “सवाई यशवंतराव पवार” या नावाला शोभेल असच वैभवशाली होत.
श्रीमंत पवार सरकार संस्थानातील धाकली पाती (देवास ज्युनिअर) कारभार जिवाजीराव पवार यांचे कडे आला.श्रीमंत जिवाजीराव १७८५ मध्ये मरण पावले. १८९२ मध्ये मल्हारराव पवार या संस्थानच्या गादीवर आले. श्रीमंत मल्हारराव नारायणराव पवार यांचे देहावसान ४ फेब्रुवारी १९३४ रोजी झाले.त्याचे वारस म्हणून श्रीमंत सदाशिवराव जिवाजीराव पवार सरकार यांचे अधिपत्याखाली कोपरगावच्या जहागिरीचा कारभार करण्यात आला.श्रीमंत महामहीम सदाशिवराव जिवाजीराव पवार सरकार यांचे २ डिसेंबर १९४३ रोजी देवास येथे देहवासन झाले.त्यांचे वारस म्हणून श्रीमंत महामहीम यशवंतराव (दूसरा) सदाशिवराव पवार सरकार यांचे अधिपत्याखाली श्रीमंत पवार सरकार संस्थानचा कोपरगाव कारभार आला. श्रीमंत भाऊसाहेब महाराज या नावाने पवार संस्थान आणि कोपरगांवातील जुन्या पिढीत ओळखले जात. बाजारतळातील पवार सरकार यांचा हत्ती खाना…गांवातील कारभार पहातांना हत्तीच्या अंबारीतून शानदार फेरफटका असत. त्यांचे नंतर महाराणी श्रीमती मेनकाराजे यशवंतराव पवार व राजकुमारी उदयादेवी रुद्रेंद्रसिंग अधिपत्याखाली कारभार सुरू आहे. तत्कालीन कोपरगावचे पोलिस पाटील बाबुराव पाटील यांचे कडे पुढील कारभार पाहिला जात असे.इंग्रज अंमलाच्या आरंभीच्या काळात श्रीमंत पवारांनी हिंदू संस्कृतीचा आणि महादेव देवस्थानाच्या जिर्णोद्धाराचा प्रारंभ आपल्या संस्थानात प्रयत्न केल्याचे एका प्रकटनावरून कळते.
श्रीमंत पवार सरकार संस्थानिकांनाही नंतर ‘महाराज’ ही उपाधी मिळाली. या शाखेला १५ तोफांच्या सलामीचा मान व दत्तकाची सनद होती. संस्थानची लोकसंख्या व उत्पन्न अनुक्रमे ६६,९९८ (१९४१) व २० लक्ष रुपये होते. शिक्षण, आरोग्य व जकातव्यवस्था सोडली, तर दोन्ही पात्यांचा( सिनिअर व ज्युनिअर ) कारभार स्वतंत्र होता. दोन्ही पात्यांत १९२२ पासून जबाबदार राज्यपद्धती अंमलात आली. विसाव्या शतकात दोन्ही पात्यांत स्थानिक स्वराज्य, शिक्षण, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, बँका, वनसंरक्षण, वृत्तपत्रे, हरिजनांचा उद्धार, औद्योगिकीकरण, छापखाने वगैरे बाबतींत अनेक सुधारणा झाल्या. १९४८ मध्ये ही दोन्ही संस्थाने त्यावेळच्या मध्य भारत संघात विलीन झाली आणि पुढे १ नोव्हेंबर १९५६ रोजी मध्य प्रदेश राज्यात समाविष्ट करण्यात आली.विलिनीकरणाच्या वेळेचे विद्यमान संस्थानिक यशवंतराव १९४३ मध्ये गादीवर आले.
श्रीमंत पवार सरकार यांनी कोपरगाव गावठाण येथील सोमेश्वर महादेव,बेट येथील संजीवनी पार लगत श्रीमंत महादेव मंदिर, जेऊर कुंभारी येथील गंगेश्वर महादेव मंदिर, जेऊर कुंभारी येथील वाडा,कोपरगाव गावठाण येथील वाडा, कोपरगावची ऐतिहासिक वेस अशा अनेक स्मृती वास्तू दर्जेदार उभारणी केली.स्वातंत्र्यापुर्वी कोपरगांव सह पंचक्रोशीतील डाक घर पवार सरकार वाड्यात होते.पारंपारिक बैलपोळा सणाला श्रीमंत पवार सरकार यांना मान राहिला आहे.सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने आजही बैलपोळा साजरा करण्यात येतो.श्रीमंत पवार सरकार यांचे कडील कोपरगाव नगरीचा कारभार असल्याचे आजही पहावयास मिळतात.देशभरातून आजही अनेक नामांकित लोक येथे भेटी देतात.
थोडक्यात सांगायचे तर राष्ट्र प्रथम विचार अंगिकारलेल्या… रणांगणावर पुरुषार्थ गाजवलेल्यांनी कोपरगावनगरित वास्तव राहुन या नगरीचा कारभार पाहिला. आपण या गावाचे नागरिक आहोत याचा अभिमान प्रत्येकाला वाटायला हवा.
सुमारे २६३ वर्षांनी पानिपतचा पराक्रम वाचतांना अंगावर शहारे येतात. मराठ्यांनी पानिपतच्या रणभूमीवर दिलेली झुंज एवढी कडवी की,अब्दालीच काय हिंदूस्थानकडे या मार्गाने वाकड्या नजरेने पहाण्याची त्यामार्गे अनेक वर्ष कोणाची हिम्मत झाली नाही.
पानिपतच्या रणभूमीवर सदाशिवराव भाऊ पेशवा यांचे नेतृत्वाखाली बलिदान देणाऱ्या मराठा साम्राज्यातील सरदार यशवंतराव राजे पवार, इतिहासात अजरामर झालेले वीर योद्धा,धर्मरक्षण आणि उत्तम प्रशासक असलेले “श्रीमंत, महामहीम, सरकार आणि महाराज” अशा उपाध्यांनी सन्मानित झालेले धार-देवासचे श्रीमंत पवार संस्थान आणि मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा रोवणारे श्रीमंत राघोबादादा पेशवा यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन…🌹🙏
भारताच्या स्वातंत्र्यानंतर राजे-महाराजे यांची राज संस्थाने मध्य भारत संघात विलीन झाली.भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी पर्वानंतर स्वराज्यासाठी लढलेल्या राज संस्थानांचा आणि ईमानदार मावळे, सैनिकांचा अभिमान भारतीयांना असायला हवा…

जय हिंद ! जय भारत !

(माहिती संकलन करणारे श्री. सुशांत घोडके हे गोदातीर परिसर ईतिहास संशोधन मंडळ सदस्य असून श्रीमंत पवार सरकार संस्थानचे महादेव देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत…)
मो.९४२३१६६१०३,९९७५२५७७९९

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे