के. जे. सोमैया महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन उत्साहात संपन्न
के. जे. सोमैया महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन उत्साहात संपन्न
के. जे. सोमैया महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन उत्साहात संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि १४ जानेवारी २०२५–महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ पंधरवड्यानिमित्त के. जे. सोमैया महाविद्यालयात गेल्या पंधरा दिवसांपासून वाचनाला केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने ११ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२५ या दरम्यान महाविद्यालयात भव्य ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अॅड. एस.डी. कुलकर्णी (सचिव, को. ता. ए. सोसायटी कोपरगाव) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी अॅड. एस.डी. कुलकर्णी म्हणाले की, “आपले ग्रंथालय हे जुने आणि नवे अशा अनेक वैविध्यपूर्ण व दुर्लभ ग्रंथांनी समृद्ध असे ग्रंथालय आहे.असे उत्तमोत्तम ग्रंथ वाचून विद्यार्थी वाचकांनी आपला सर्वांगीण विकास घडवून आणावा.” अॅड. कुलकर्णी यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांनी ग्रंथालयाला अनेक ग्रंथ भेट दिलेले आहेत. ग्रंथ प्रदर्शनामध्ये व्यक्तिमत्व विकास, शब्दकोश, विश्वकोश, चरित्र, आत्मचरित्र, कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, खेळ, स्पर्धा परीक्षा आदी विविध विषयांवरील मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील ग्रंथांचा समावेश आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डाॅ. व्ही. सी. ठाणगे यांची यावेळी उपस्थिती होती.

प्राचार्य ठाणगे यांनी कोपरगाव शहर तसेच आसपासच्या गावातील नागरिकांनाही ग्रंथ प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन या प्रसंगी केले. ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. निता शिंदे म्हणाल्या की, आपल्या ग्रंथालयात एक लाखाहून अधिक ग्रंथ आहेत. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वापर करावा असे आवाहन केले तसेच ऊपस्थितांचे आभारही डॉ. शिंदे यांनी मानले. या ग्रंथ प्रदर्शनासाठी वाणिज्य विभागप्रमुख प्रो. डॉ. एस आर. पगारे, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुरेखा भिंगारदिवे, हिंदी विभागप्रमुख प्रो. डॉ . जिभाऊ मोरे, भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. बी. बी. भोसले, मराठी विभागप्रमुख प्रा. संपत आहेर , राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश देवरे इंग्रजी विभागाच्या प्रा.वर्षा आहेर यांच्यासह सर्वच विभागातील प्राध्यापक, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागाचे विकास सोनवणे, स्वप्नील आंबरे, गणेश पाचोरे, रविंद्र रोहमारे, अजय पिठे, लांडगे परसराम, हजारे महेश, माळी दिनकर, यांनी विशेष परिश्रम घेतले.
