के. बी. रोहमारे पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न

के. बी. रोहमारे पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न
के. बी. रोहमारे पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि ८ डिसेंबर २०२५-महाराष्ट्राच्या राजकीय चारित्र्याचा, नैतिकतेचा व मूल्यांचा इतिहास जर कुणाला लिहावासा वाटला तर त्या पुस्तकातील खूप जागा के.बी. रोहमारेंचे व्यक्तिमत्व घेईल. आजच्या राजकारणातील नागवेपण संपवायचे असेल तर केबीं सारख्या तत्त्वनिष्ठ राजकारण्यांची गरज आहे. के.बी. साहेबांनी कृष्णाकाठा प्रमाणे गोदाकाठी क्रांती आणली. नगर जिल्हा हा क्रांतिकारी जिल्हा आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या साकरबेन सोमैया सभागृहामध्ये आयोजित के. बी. रोहमारे 28 वे पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य डॉ. सुधीर तांबे होते. तर भि. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व सचिव रावसाहेब रोहमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मा. कांबळे पुढे म्हणाले की, “यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब भारदे, नागनाथ आण्णा नाईकवाडी, मारुतराव घुले पाटील, भाऊसाहेब थोरात आदींच्या सानिध्यात के. बी. साहेबांची वैचारिक जडणघडण झाली होती. राजकारण व समाजकारणाबरोबरच साहित्याविषयी देखील के.बी. साहेबांना प्रचंड आस्था होती. म्हणूनच त्यांनी असा अनोखा उपक्रम सुरू केला आणि त्यांच्या नंतरच्या पिढीनेही तो आजतागायत सुरू ठेवला ही अभिमानाची गोष्ट आहे. वेदना व प्रतिभेच्या संगमातून साहित्याचा जन्म होतो. साहित्यातील शब्द हे लेखकाच्या काळजातून आलेले असतात. म्हणूनच ते समाजाचे व व्यक्तीचे जीवन अंतर्बाह्य बदलून टाकतात. चांगले व दर्जेदार साहित्य माणसाच्या चेहर्यावर आत्मसम्मान बहाल करत असतात. आज इथे पुरस्कार प्राप्त सर्व लेखक बंधूंचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. सुधीर तांबे म्हणाले की “के. बी. रोहमारे साहेबांनी सामान्य माणसाला, शेतकरी व शेतमजुराला पुढे नेण्याचे काम केले. शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना सक्षम बनविण्यासाठी गोदाप्रवरा यासारख्या सहकार क्षेत्रामध्ये अनेक मोठमोठ्या संस्थांची स्थापना केली. के. बी. ची पिढी ही एक समर्पित पिढी होती. त्यांना ग्रामीण जीवनाविषयी प्रचंड कळवळा होता. म्हणूनच त्यांनी सुरू केलेल्या अशा योजना आज ग्रामीण जीवनाचा श्वास बनलेल्या आहेत. आज देशात सुरू असलेले प्रतिक्रांतीचे वारे थोपविण्याची जबाबदारी ही या पुरस्कार प्राप्त लेखकांची आहे. त्यांनी के. बी. रोहमारे व अशोकराव रोहमारे यांचा वारसा समर्थपणे पुढे न्यावा.

भि. ग. रोहमारे ट्रस्टच्या वतीने मनोगत व्यक्त करताना ट्रस्टचे व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी या पुरस्काराला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करतानाच यापुढेही ही योजना अखंडपणे सुरू राहील. हा पुरस्कार प्राप्त झालेल्या अनेक ग्रामीण नवलेखकांना पुढे साहित्य अकादमी सारखे पुरस्कार प्राप्त झाल्याने या पुरस्काराचा अधिक अभिमान असल्याचेही रोहमारे म्हणाले. पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या भावना व्यक्त करताना सर्वोत्कृष्ट ग्रामीण कादंबरी नांगरमुठीचे लेखक पांडुरंग पाटील कोल्हापूर म्हणाले की ” भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार हा साहित्यातील साहित्य अकादमी सन्मान असून त्याचे मोल आमच्यासारख्या लेखकांसाठी पारिजातका समान आहे. पुरस्कारप्राप्त कवी सागर जाधव जोपुळकर म्हणाले की हा पुरस्कार म्हणजे माझ्या कवितेला महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात मिळालेला अनमोल सन्मान आहे. याप्रसंगी जाधव यांनी आपली एक मार्मिक ग्रामीण कविता देखील सादर केली. कवी सचिन शिंदे, डॉ. हंसराज जाधव, डॉ. नारायण शिवशेट्टे व भारत सातपुते यांनीही आपापल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी पांडुरंग पाटील (राधानगरी, कोल्हापूर) यांना ‘नांगरमुठी’ या ग्रामीण कादंबरीसाठी रुपये, १५०००/-, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व बुके, डॉ. हंसराज जाधव (पैठण) यांना ‘मोहरम’ या ग्रामीण कथासंग्रहासाठी १५०००/-, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व बुके, सचिन शिंदे (उमरखेड,यवतमाळ) यांच्या पातीवरल्या बाया व सागर जाधव जोपुळकर (चांदवड, नाशिक) यांच्या माती मागतेय पेनकिलर या ग्रामीण कविता संग्रहांसाठी (विभागून) प्रत्येकी ७५००/- सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व बुके तर डॉ. नारायण शिवशेट्टे (अर्जापूर,नांदेड) यांच्या ग्रामीण आत्मकथनात्मक वाङमय: एक अभ्यास या ग्रामीण समीक्षेसाठी व भारत सातपुते (गातेगाव, लातूर) यांना ‘जागरण’ या ग्रामीण आत्मकथनासाठी (विभागून) प्रत्येकी ७५००/- सन्मान चिन्ह, सन्मानपत्र मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख अतिथींचे स्वागत व प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी महाविद्यालयाच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त आलेख प्रस्तुत करत के. बी. साहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार, शेती आदी क्षेत्रातील योगदानावर विस्तृत प्रकाशझोत टाकला. पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. जिभाऊ मोरे यांनी भि. ग. रोहमारे ट्रस्टची स्थापना व पुरस्कार योजनेची पार्श्वभूमी कथन करताना सांगितले की “गेल्या 36 वर्षापासून अव्याहतपणे भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार दिला जातोय. या पुरस्कार योजनेत संयोजक आणि परीक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. कुठल्याही बाह्यहस्तक्षेपाविना निवड समिती काम करते. आज पर्यंत 183 पेक्षा अधिक ग्रामीण साहित्यिकांना या पुरस्काराने गौरविले गेले असून त्यातील अनेकांना साहित्य अकादमीसह इतर मोठे मानसन्मान लाभले आहेत.” त्याचबरोबर त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
याप्रसंगी शोभाताई रोहमारे, मंदाताई रोहमारे, माजी जि. प. सदस्य सोनालीताई रोहमारे तसेच कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, सुनील शिंदे, संदीप रोहमारे, ऍड. राहुल रोहमारे पत्रकार मनोज जोशी, संतोष जाधव, मोबीन खान, विजय कापसे, अनिल दीक्षित, रवींद्र जगताप, संतोष जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे व प्रा. वर्षा आहेर यांनी केले. तर डॉ. रवींद्र जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, डॉ. नामदेव ढोकळे, डॉ. जी एस शिंदे, डॉ. एन जी शिंदे, डॉ. व्ही. एस. साळुंके, डॉ. सुरेखा भिंगारदिवे, डॉ. बी. एस. गायकवाड व सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.



