लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दिला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा
महाराष्ट्राच्या व देशाच्या उभारणीत यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान –माजी मंत्री बाळासाहेब थोरात
अमृतवाहिनीत यशवंततीर्थ येथे 41 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

संगमनेर प्रतिनिधी दि २५ नोव्हेंबर २०२५—मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राचा कलश घेऊन येणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात कृषी औद्योगिक क्रांती राबवली. आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया त्यांनी घातला. राज्याच्या व देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान असल्याचे गौरवउद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी काढले असून यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातील अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील यशवंत तीर्थ येथे यशवंतराव चव्हाण यांच्या 41 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मा.कृषी मंत्री बाळासाहेब थोरात, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य प्रा. व्ही.बी धुमाळ, डॉ राजेंद्र वाघ, डॉ.मच्छिंद्र चव्हाण,प्रा जी.बी काळे, प्रा विजय वाघे, विलास भाटे ,सौ जे बी सेठी, अंजली कन्नावार, डॉ वृषाली साबळे, आशिष कुमार,नामदेव गायकवाड यांच्यासह अमृतवाहिनीतील विविध विभागांचे विभाग प्रमुख शिक्षक उपस्थित होते.

यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देताना महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला विकासाची वाट दाखवली. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करताना सहकार क्षेत्रासह साहित्य, समाजकारण, शिक्षण ,कृषी अशा विविध क्षेत्रात दिशादर्शक काम केले. यशवंतराव चव्हाण हे अत्यंत साधे जीवन जगले. देशाचे उपपंतप्रधान व इतर महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाबरोबर संगमनेर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या वाटचालीतही त्यांचे मोठे योगदान आहे.
याचबरोबर आपल्याला आदर्श असलेले यशवंतरावांच्या समवेतच्या सहवासाबाबत बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातील राजकारण क्षेत्रासाठी मापदंड आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आपण काम करत आहोत. स्वर्गीय तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांच्या 61 निमित्ताने ते संगमनेरला आले होते. तसेच जोर्वे येथील निवासस्थानी सुद्धा आले होते. याचबरोबर वेणू ताईंच्या निधनानंतर साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे आले. त्यावेळेस डॉ अण्णासाहेब शिंदे यांनी औरंगाबाद पासून शिर्डी आणि शिर्डी पासून श्रीरामपूर त्यांच्या निवासस्थानापर्यंत तसेच श्रीरामपूर पासून पुन्हा औरंगाबाद पर्यंत सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. नरिमन पॉईंट येथे त्यांच्या मृत्यूनंतर अत्यंत लहान घरांमध्ये त्यांचे शेवटचे दर्शन घेतले अशा त्यांच्या आठवणी अनेक आहेत .अत्यंत मोठे पण साधे व्यक्तिमत्व असलेल्या या माणसाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा कळस आणला. त्यांचे आदर्श जीवन कार्य महाराष्ट्रातील सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी ठरत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सौ शरयूताई देशमुख म्हणाल्या की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी यशवंत तीर्थावर महाराष्ट्रातील विविध नामवंत व्याख्याते,साहित्यिक, कवी यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात आले आहे. याप्रसंगी अनिल शिंदे यांनीही अभिवादन केले. यावेळी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
भाऊसाहेब थोरात यांच्या 61 च्या कार्यक्रमातील जनसमुदायाने डोळ्याचे पारणे फेडले.
अमृतवाहिनीतील मैदानावर संगमनेर तालुक्यातील जनतेच्या वतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या 61 चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. अलोट जनसागर असलेल्या कार्यक्रमातील भाषणामध्ये यशवंतरावांनी डोळ्याचे पारणे फेडणारा कार्यक्रम असा उल्लेख केला असल्याची आठवण मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितली.



