कोपरगावच्या शैक्षणिक परंपरेला संत ज्ञानेश्वर स्कूल मुळे जागतिक ओळख- डॉ. ठाणगे

कोपरगावच्या शैक्षणिक परंपरेला संत ज्ञानेश्वर स्कूल मुळे जागतिक ओळख- डॉ. ठाणगे
कोपरगावच्या शैक्षणिक परंपरेला संत ज्ञानेश्वर स्कूल मुळे जागतिक ओळख- डॉ. ठाणगे

कोपरगाव विजय कापसे दि १३ फेब्रुवारी २०२६– “कोपरगावच्या शैक्षणिक परंपरेला संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलने खऱ्या अर्थाने जागतिक ओळख मिळवून दिली आहे. नासा (NASA) सारख्या जागतिक संस्थेत झळकलेला या शाळेचा माजी विद्यार्थी रोहित पवार हे या शाळेच्या उच्च गुणवत्तेचे जिवंत प्रतीक आहे,” असे गौरवोद्गार के.जे.सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी काढले. कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूलच्या ‘संस्कृति संगम’ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र झावरे, नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सालकर, को.ता. पतसंस्था चेअरमन पोपट झुरळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सोनवणे, ॲड.शंकर यादव, मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे, प्राचार्य सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

आधुनिक शिक्षण आणि भारतीय संस्कारांचा ‘संगम’ यावर्षीच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना ‘संस्कृति संगम’ ही अत्यंत कल्पक होती. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत आणि मराठीचा संगम साधला, त्याचप्रमाणे ही शाळा पाश्चात्य शिक्षण (English Medium) आणि भारतीय मूल्ये (Indian Values) यांचा मेळ घालत असल्याचे डॉ. ठाणगे यांनी नमूद केले. तसेच डिजिटल युगात मुलांच्या डोळ्यांसमोर मोबाईलऐवजी पुस्तके असावीत, तरच खरी बौद्धिक समृद्धी लाभेल, असे आवाहनही त्यांनी पालकांना केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पत्रकार राजेंद्र सालकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची ओळख केवळ त्यांच्या गुणपत्रिकेवरून ठरवू नका. त्यांच्यातील छंद, कला आणि मैत्री जपण्याची वृत्ती त्यांना आयुष्यात यशस्वी करते. शाळेने कायम राखलेल्या १०० टक्के निकालाच्या परंपरेचेही त्यांनी कौतुक केले.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
शाळेचा वार्षिक अहवाल शाळेच्या उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे यांनी सादर केला,मान्यवरांचा परिचय चैताली पुंडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन वैष्णवी काळे व गीतांजली आहेर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उमा गिरमे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्नेहसंमेलनाचे महत्त्व अधोरेखित करताना मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे म्हणाले की, “स्नेहसंमेलन म्हणजे केवळ गाणी किंवा नृत्याचा कार्यक्रम नसून, तो विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या कष्टांचा आणि सुप्त कलागुणांचा आविष्कार असतो. व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांमधील स्टेज-डेअरिंग वाढते आणि त्यांचा आत्मविश्वास बळकट होतो. ‘संस्कृति संगम’ ही संकल्पना राबवण्यामागे आमचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना आपल्या मुळांशी जोडून ठेवणे हाच आहे. आधुनिक काळाशी स्पर्धा करताना आमचा विद्यार्थी आपल्या संस्कृतीचा विसर पडू देणार नाही, याची आम्ही काळजी घेतो.”



