के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा

के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा
के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा

कोपरगाव विजय कापसे दि २७ फेब्रुवारी २०२६– “माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके” संत ज्ञानेश्वरांच्या या अभंगाने तसेच ‘नमने वाहून’ या कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितेने सुरुवात करून मराठी भाषेची समृद्ध परंपरा,विविध शिलालेख,संत-पंत आणि तंत साहित्याचे योगदान व महत्त्व विशद करतानाच विद्यार्थी हा उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक असून विद्यार्थ्यांशिवाय शिक्षकाला अर्थ उरत नाही असे प्रतिपादन मा.प्रा. चंद्रभान देशमुख यांनी केले. स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित “मराठी भाषा गौरव दिनाचे” प्रमुख अतिथी म्हणून प्रा.देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी संदीप रोहमारे होते. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुधीर डागा, प्राचार्य डॉ. विजय ठाणगे,प्रा.संदीप सातपुते यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षस्थानावरून बोलताना मा.संदीप रोहमारे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी मराठी भाषा व साहित्यावरील प्रेम व्यक्त करत आपला व्यासंग वाढविला पाहिजे. शिक्षणातील मराठीचे महत्त्व वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठीबरोबरच आणखी एका अन्य भाषेत कौशल्य प्राप्त केल्यास विद्यार्थ्यांना अनुवादाच्या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत. अभ्यासू, मेहनती विद्यार्थी तसेच प्राध्यापक व सक्षम प्राचार्यांच्या बळावरच कोणतेही महाविद्यालय उच्च गुणवत्ता प्राप्त करू शकते.”

कार्यक्रमाचे दुसरे अतिथी मा.सुधीर डागा म्हणाले की “नुसत्या भिंती व इमारतीतून संस्था व महाविद्यालये मोठी होत नसतात, तर तेथील विद्यार्थी व प्राध्यापक आणि ध्येयवेड्या प्राचार्य व संस्थासंचालकांमुळेच ती मोठी होतात. नुकतेच ‘ए प्लस‘ ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त केलेले के.बी.रोहमारे महाविद्यालय हे त्याचेच उदाहरण होय. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या अभ्यासातून आपली वक्तृत्व व लेखनशैली विकसित करत करियर करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा.” कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थी व प्राध्यापकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देत मा. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी विद्यार्थ्यांना वाचनावर लक्ष केंद्रित करण्याचा बहुमोल सल्ला देत ग्रंथांसारखा दुसरा श्रेष्ठ मित्र नसल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी वाङ्मय, वक्तृत्व, क्रीडा, अभिनय आदी प्रकारात नैपुण्य प्राप्त करून अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवत असल्याचेही सांगितले.

याप्रसंगी ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ व ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त घेण्यात आलेल्या काव्यवाचन, वक्तृत्व,सुंदर स्वाक्षरी,ग्रंथ रसग्रहण व निबंधलेखन स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. मराठी विभाग प्रमुख प्रा.संपत आहेर यांनी प्रास्ताविक व अतिथी परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा.विनोद शिनगारे व प्रा.संजय दवंगे यांनी केले तर प्रा.नवनाथ वैद्य यांनी उपस्थितांचे आभार मानले. या समारंभाला डॉ.जिभाऊ मोरे, प्रा.किरण सोळसे, डॉ.रवींद्र जाधव, प्रा.अमोल चिने, प्रा.अशोक सूर्यवंशी, प्रा.रविकांत मरभळ, डॉ.संजय अरगडे, प्रा.विजय सोमासे, डॉ.दिलीप बागुल, प्रा.प्रवीण मोरे प्रा. अमोल बंद्रे, प्रा.दिनेश घुगे, प्रा.परीक्षित जाधव, प्रा.आदित्य देशमुख आदींची विशेष उपस्थिती होती तर बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उस्फूर्तपणे हजर होते.



