आपला जिल्हा
मानसिक स्थिरतेसाठी सहज योग महत्त्वाचा– डॉ निलेश जंगले; कारखाना कार्यस्थळावर अध्यात्मिक सहज योग शिबिर संपन्न

मानसिक स्थिरतेसाठी सहज योग महत्त्वाचा– डॉ निलेश जंगले; कारखाना कार्यस्थळावर अध्यात्मिक सहज योग शिबिर संपन्न

मानसिक स्थिरतेसाठी सहज योग महत्त्वाचा– डॉ निलेश जंगले; कारखाना कार्यस्थळावर अध्यात्मिक सहज योग शिबिर संपन्न

संगमनेर विजय कापसे दि ६ मार्च २०२६—मानवी मन हे अत्यंत चंचल आहे. मनामध्ये अस्थिरता निर्माण झाली की मानसिक शारीरिक आणि भावनिक आजार सुरू होतात. म्हणून मनशांती होणे अत्यंत गरजेचे असून चांगल्या मानसिक स्थितीसाठी सहज योग महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन डॉ निलेश जंगले यांनी केले आहे.


यावेळी बोलताना डॉ. जंगले म्हणाले की, मानवी मनात अस्थिरता निर्माण झाली आहे आणि याचा परिपाक जग हे युद्धजन्य परिस्थिती मध्ये आहे. मन शांत असेल तर विकार दूर होतात. आणि याकरता सहज योग महत्त्वाचा आहे. सहज योग म्हणजे स्वतःबरोबर जन्म घेतलेला योग. भूतकाळ किंवा भविष्यकाळाचा विचार करण्यापेक्षा प्रत्येकाने वर्तमान काळाचा विचार करावा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा शरीरामध्ये निर्माण होणारी अति उष्णता ही विकारांचे कारण असून मन व आत्मशुद्धी द्वारे विकार दूर करता येतात असे ते म्हणाले.

तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की योग प्राणायाम आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे परंतु त्याही पुढे सहज योगातून मनुष्याला आरोग्याबरोबर आत्मशांती मिळते आहे. या परिवाराच्या माध्यमातून जगामध्ये अनेक माणसे जोडले गेले असून सहज योगाच्या माध्यमातून होणारी मनशांती ची शिकवण अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांना दिली गेली पाहिजे. कारण आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे कारण अद्याप कळत नाही. अनंतशक्तींशी व्यक्ती जोडण्याकरता सहजोग परिवाराचे काम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
तर मा आ डॉ तांबे म्हणाले की व्यक्तींच्या मानसिक स्थितीवर आजारांचे संबंध काही अर्थाने अवलंबून आहे .मन अशांततेमुळे आजार वाढत असून मन शुद्ध व निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने सतर्क रहावे , चांगला आहार व्यायाम आणि निरोगी जीवनशैली प्रत्येकाने अंगी करावे असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप सातपुते यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले .यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी व अमृत नगर परिसरातील अनेक साधक उपस्थित होते.
