आपला जिल्हा

पुणतांबा ऐतिहासिक होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी निधीची ग्रामविकास मंत्री यांच्याकडे मा. आ. कोल्हे यांची मागणी

पुणतांबा ऐतिहासिक होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी निधीची ग्रामविकास मंत्री यांच्याकडे मा. आ. कोल्हे यांची मागणी

दक्षिण काशी श्रीक्षेत्र पुणतांबा येथील ऐतिहासिक होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी निधी द्या;ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ३१ मे २०२६कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील ऐतिहासिक होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जाहिरात

माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील श्रीक्षेत्र पुणतांबा हे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. शिर्डीपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर वसलेले हे गाव गोदावरी नदी येथे उत्तरवाहिनी होत असल्याने विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. वैदिक काळापासून ऋषी-मुनींनी येथे तपश्चर्या केली असून पुण्यप्राप्ती व मोक्षप्राप्तीसाठी काशीनंतर पुणतांब्याला विशेष महत्त्व असल्याची श्रद्धा आहे.

जाहिरात

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी गोदावरी नदीकाठी सन १७६५ ते १७९५ या कालावधीत भव्य होळकर घाट उभारला तसेच परिसरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. गावातील अहिल्यादेवींनी बांधलेला वाडा आजही अस्तित्वात असला तरी तो जीर्ण अवस्थेत आहे. गोदावरी तटावरील धार्मिक परंपरा आणि भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता होळकर घाटाचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.

जाहिरात

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, पुणतांबा हे प्रख्यात संगीतकार सी. रामचंद्र (रामचंद्र नरहर चितळकर) यांचे जन्मगाव आहे. साईबाबांच्या आरत्या व भजनांचा समावेश असलेली पहिली ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध करण्याबरोबरच भारतरत्न लता मंगेशकर यांना “ए मेरे वतन के लोगो” या अजरामर गीतासाठी संधी देण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यामुळे पुणतांबा हे धार्मिकतेबरोबरच सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचेही केंद्र आहे.

गोदावरी तटावर होळकर घाटासह ब्राह्मण घाट आणि विठ्ठल घाट असे तीन प्रमुख घाट आहेत. परिसरात विविध देवदेवतांची मंदिरे असून धार्मिक विधी, अस्थी विसर्जन आणि इतर संस्कारांसाठी राज्यभरातून भाविक येथे मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी होळकर घाटाची पुनर्बांधणी करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र पुणतांबा येथील ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी विशेष निधी उपलब्ध करून संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे