तंत्रज्ञानातील बदल स्वीकारून स्वतःला अद्ययावत करा – अमित कोल्हे

तंत्रज्ञानातील बदल स्वीकारून स्वतःला अद्ययावत करा – अमित कोल्हे
सीईटी परीक्षेत ९० ते ९९.९९ पर्सेन्टाईल मिळविणाऱ्या संजीवनीच्या ३७ विद्यार्थ्यांचा सत्कार

Kopargaon vijay kapse दि १५ जुलै २०२६: झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी काळानुसार स्वतःला अद्ययावत ठेवत नवे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कितीही प्रगत झाली तरी तिचा योग्य वापर करण्यासाठी मानवी ज्ञान, विवेक आणि कौशल्य यांनाच सर्वाधिक महत्त्व असल्याचे प्रतिपादन संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या एमएचटी-सीईटी परीक्षेत ९० ते ९९.९९ पर्सेन्टाईल मिळविणाऱ्या ३७ गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून अमित कोल्हे बोलत होते. कार्यक्रमास संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

यंदाच्या परीक्षेत प्रथमेष रवींद्र गोसावी याने ९९.९९ पर्सेन्टाईल मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सिद्धेश प्रशांत क्षत्रिय याने ९९.२० पर्सेन्टाईलसह द्वितीय, तर शौर्य संतोष थोरात याने ९६.०८ पर्सेन्टाईल मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
यावेळी अमित कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना संजीवनीच्या अल्युम्नी पोर्टलवर नोंदणी करून जगभर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केले. तसेच संजीवनी ज्युनिअर कॉलेजने सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखण्यात शिक्षकांचे परिश्रम आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळ आणि विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सर्वांगीण विकास साधावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

प्रमुख पाहुण्या डॉ. मनाली कोल्हे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा केवळ त्यांच्या गुणांचा नसून त्यांच्या समर्पण, शिस्त आणि दृढनिश्चयाचा सन्मान असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचे त्याग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन मोठे योगदान असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाला सर्वोच्च प्राधान्य देत देश आणि समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास डॉ. राजन शेंडगे, डॉ. विपुल पटेल, प्रा. रेखा साळुंके यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



