दिवाळी हाट’मुळे महिला उद्योजिकांच्या व्यवसायाला भरारी; तीन दिवसांत झाली लाखोंची उलाढाल


Kopargaon vijay kapse दि २८ ऑक्टोबर २०२६ :- दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने महिला बचत गट, गृहउद्योग करणाऱ्या महिला आणि स्थानिक व्यावसायिकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या ‘दिवाळी हाट’ खरेदी महोत्सवाला कोपरगावकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. तीन दिवसांत लाखोंची उलाढाल झाल्याने महिला उद्योजिकांना आर्थिक उत्पन्नाची संधी मिळाली, तर स्थानिक बाजारपेठेलाही चालना मिळाली. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या ‘दिवाळी हाट’ खरेदी महोत्सवात कोपरगाव तालुक्यासह ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी सहभाग नोंदवत आपली उत्पादने विक्रीसाठी आणली होती. घरगुती वस्तू, दिवाळीचे फराळाचे पदार्थ आणि विविध उत्पादनांची विक्री येथे करण्यात आली. दर्जेदार, स्वदेशी आणि रास्त दरातील वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांना खरेदीची चांगली संधी मिळाली.









