रस्ते विकास महामंडळाचे नियोजन प्राधिकरणाचे कार्यालय कोपरगावात करा; आ. आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
रस्ते विकास महामंडळाचे नियोजन प्राधिकरणाचे कार्यालय कोपरगावात करा; आ. आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
रस्ते विकास महामंडळाचे नियोजन प्राधिकरणाचे कार्यालय कोपरगावात करा; आ. आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kopargaon vijay kapse दि २५ नोव्हेंबर २०२६ :– समृद्धी महामार्गालगत विकसित होणाऱ्या कृषी समृद्धी केंद्रे नवनगरांच्या नियोजन व विकासाला गती मिळावी आणि स्थानिक नागरिकांना परवानग्यांसाठी मुंबईच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) नियोजन प्राधिकरणाचे कार्यालय कोपरगाव येथे सुरू करावे, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

समृद्धी महामार्गालगत हजारो एकर क्षेत्रावर विकसित होणाऱ्या कृषी समृद्धी केंद्रे नवनगरांच्या नियोजनाची जबाबदारी राज्य शासनाने एमएसआरडीसीकडे सोपविली असून, या महामंडळाची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, प्राधिकरणाचे कार्यालय मुंबईत असल्याने विकासकामांसाठी आवश्यक परवानग्या, प्रस्ताव व प्रशासकीय प्रक्रियांसाठी स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांना मुंबईला जावे लागणार आहे. त्यामुळे वेळ आणि श्रम खर्च होण्याबरोबरच नवनगरांच्या विकास प्रक्रियेतही विलंब होण्याची शक्यता आहे.

या नवनगरांच्या विकास आराखड्यांची निर्मिती, विकास नियंत्रण नियमांची अंमलबजावणी, पायाभूत सुविधांचे नियोजन, जमीन वापर निश्चिती, रस्ते, औद्योगिक, निवासी व व्यावसायिक क्षेत्रांची आखणी, बांधकाम परवानग्या देणे अथवा नाकारणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई असे महत्त्वाचे अधिकार नियोजन प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.या पार्श्वभूमीवर नियोजन प्राधिकरणाचे कार्यालय मुंबई ऐवजी कोपरगाव येथे सुरू झाल्यास कोपरगाव व राहाता तालुक्यातील शेतकरी, जमीनधारक, उद्योजक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होऊन परवानगी प्रक्रियेला गती मिळेल आणि कृषी समृद्धी केंद्रे नवनगरांच्या नियोजित विकासाला चालना मिळेल. स्थानिक पातळीवर कार्यालय उपलब्ध झाल्यास नागरिकांचा वेळ वाचून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला अधिक वेग येईल, असे आमदार आशुतोष काळे यांनी दिल्लेल्या निवेदनात म्हटले आहे.




