संजीवनीच्या मार्गदर्शनातून धनश्री चौधरीचे जर्मनीत उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार
संजीवनीच्या मार्गदर्शनातून धनश्री चौधरीचे जर्मनीत उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार
सारलँड विद्यापीठात एम.एस.साठी संपूर्ण शिष्यवृत्तीसह निवड; निवास, प्रवास, भोजनाचा खर्च विद्यापीठ करणार, दरमहा एक लाख रुपयांचे स्टायपेंडही मिळणार

Kopargaon vijay kapse दि २८ नोव्हेंबर २०२६-: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, जिद्द आणि कर्तृत्वाची कमतरता नसते. योग्य मार्गदर्शन, संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास हे विद्यार्थी जागतिक स्तरावरही आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात, याचा प्रत्यय संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या धनश्री प्रणील चौधरी हिच्या यशातून पुन्हा एकदा आला आहे. जर्मनीतील जागतिक स्तरावर प्रतिष्ठित असलेल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ सारलँड’ येथे एम.एस. (पदव्युत्तर पदवी) शिक्षणासाठी धनश्रीची संपूर्ण शिष्यवृत्तीसह निवड झाली आहे.

विशेष म्हणजे, धनश्रीच्या दोन वर्षांच्या उच्च शिक्षणाचा संपूर्ण खर्च विद्यापीठाकडून केला जाणार आहे. यामध्ये निवास, प्रवास आणि भोजनाचा खर्च समाविष्ट असून, वैयक्तिक खर्चासाठी दरमहा भारतीय चलनानुसार सुमारे एक लाख रुपये स्टायपेंडही मिळणार आहे. याशिवाय दोन वर्षांच्या कालावधीत पार्टटाइम नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्रही विद्यापीठाने दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने मिळविलेल्या या यशामुळे संजीवनीच्या शैक्षणिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय वाटचालीला आणखी एक यशस्वी अध्याय जोडला गेला आहे.

धनश्रीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी धनश्री व तिच्या पालकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी धनश्री, तिचे वडील प्रणील दगुराव चौधरी आणि आई स्वाती प्रणील चौधरी यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, विभागप्रमुख डॉ. माधुरी जावळे आणि संजीवनी इंटरनॅशनल विभागाचे डीन डॉ. महेंद्र गवळी उपस्थित होते.

धनश्रीने जून २०२६ मध्ये संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.टेक. (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) ही पदवी पूर्ण केली. त्यानंतर संजीवनीच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तिने जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ सारलँडमध्ये एम.एस. प्रवेशासाठी नियोजनबद्ध तयारी केली. विशेष म्हणजे, बी.टेक.च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असतानाच तिची तैवानमधील एका नामांकित विद्यापीठात तीन महिन्यांच्या संशोधन प्रकल्पावरील इंटर्नशिपसाठी निवड झाली होती. ही इंटर्नशिप पूर्णपणे प्रायोजित होती. तैवानमधील संशोधन प्रकल्पादरम्यान मिळालेला अनुभव आणि संजीवनीतील प्राध्यापकांचे मार्गदर्शन यांचा जर्मनीतील उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्यात मोठा फायदा झाल्याचे धनश्रीने सांगितले. यावेळी धनश्रीचे वडील प्रणील चौधरी यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, धारणगावसारख्या ग्रामीण भागातील मुलगी संजीवनीच्या मार्गदर्शनामुळे जर्मनीमध्ये संपूर्ण मोफत उच्च शिक्षणासाठी जात आहे, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

ग्रामीण भागातून जागतिक स्तराकडे; संजीवनीचा ‘रूरल टू ग्लोबल’ संकल्प!
संस्थापक स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांचे स्वप्न होते की, ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण, संशोधन आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. त्यांचे हे स्वप्न श्री. नितीनदादा कोल्हे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली संजीवनीच्या माध्यमातून साकार होत आहे.
‘रूरल टू ग्लोबल’ हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार, परदेशातील संशोधन प्रकल्प, प्रायोजित इंटर्नशिप आणि परदेशात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा सुनियोजित रोडमॅप संजीवनीने आखला आहे. धनश्री चौधरीची जर्मनीतील नामांकित विद्यापीठात संपूर्ण शिष्यवृत्तीसह झालेली निवड हे संजीवनीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे, दूरदृष्टीपूर्ण नियोजनाचे आणि प्राध्यापकांच्या समर्पित मार्गदर्शनाचे फलित आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करून देशाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी संजीवनी सातत्याने प्रयत्नशील राहील.
अमित कोल्हे प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी



