मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ घ्यावा- आ. आशुतोष काळे
शेतीला पूरक व्यवसायातून उत्पन्नाची संधी; इच्छुकांनी तातडीने अर्ज करावेत

पावसातील अनिश्चितता आणि शेतीसमोरील वाढती आव्हाने पाहता शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करण्यावर भर देणे गरजेचे आहे. दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायातून नियमित उत्पन्नाची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पशुधन व्यवसाय हा शेतीला पूरक ठरण्याबरोबरच ग्रामीण कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यासाठीही महत्त्वाचा ठरू शकतो.

या योजनेअंतर्गत गाय, म्हैस, शेळी यांसारख्या दुभत्या जनावरांचे संगोपन, शेळीपालन, कुक्कुटपालन, जनावरांसाठी शेड तसेच चारा व्यवस्थापनासंबंधी विविध पर्याय उपलब्ध आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी व महाआयडी आवश्यक असून, ज्या इच्छुक लाभार्थ्यांकडे हे आयडी नाहीत त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावेत. योजनेचा लाभ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिला जाणार असल्याने इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तातडीने अर्ज करावेत, असे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करावे लागत आहे. अशा परिस्थितीत गावातच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. पशुपालन व त्यावर आधारित व्यवसायातून युवक-युवती स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजकतेकडे वळण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. युवकांनी या संधीचा लाभ घेऊन गावातच रोजगार निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आ.आशुतोष काळे यांनी आवाहन केले आहे.



