महाराष्ट्रात स्वतंत्र अवयवदान समुपदेशक संवर्ग निर्माण करा आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्याकडे डॉ. अशोक गावित्रे यांची निवेदनाद्वारे मागणी

महाराष्ट्रात स्वतंत्र अवयवदान समुपदेशक संवर्ग निर्माण करा आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्याकडे डॉ. अशोक गावित्रे यांची निवेदनाद्वारे मागणी
महाराष्ट्रात स्वतंत्र अवयवदान समुपदेशक संवर्ग निर्माण करा आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्याकडे डॉ. अशोक गावित्रे यांची निवेदनाद्वारे मागणी
Kopargaon vijay kapse दि २९ नोव्हेंबर २०२६ महाराष्ट्रात अवयवदान, नेत्रदान, त्वचादान व देहदान चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी स्वतंत्र राज्यस्तरीय धोरण तयार करावे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात अवयवदान समुपदेशन कक्ष स्थापन करून प्रशिक्षित समुपदेशकांची नियुक्ती करावी, अशी मागणी अवयवदान समुपदेशक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे यांनी आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

देशात अवयव प्रत्यारोपणाच्या आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतानाही जनजागृतीचा अभाव, ब्रेन स्टेम डेथविषयी गैरसमज, प्रशिक्षित समुपदेशकांची कमतरता आणि रुग्णालयांमधील समन्वयाचा अभाव यामुळे अनेक संभाव्य अवयवदानाच्या संधी वाया जात आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्रात स्वतंत्र अवयवदान समुपदेशक संवर्ग निर्माण करणे, प्रत्येक जिल्हा रुग्णालयात समुपदेशन कक्ष सुरू करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण व जनजागृती केंद्र स्थापन करणे, प्रत्येक तालुक्यात अवयवदान जनजागृती समिती गठीत करणे, तसेच ब्रेन स्टेम डेथविषयी शास्त्रीय माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय अवयवदान समुपदेशकांसाठी शासनमान्य प्रशिक्षण व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करावा, पोलीस, आरोग्य विभाग आणि रुग्णालयांमध्ये समन्वय व्यवस्था निर्माण करावी, नेत्रदान, त्वचादान व देहदानासाठी स्वतंत्र जनजागृती अभियान राबवावे आणि या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रशिक्षणासह शासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

नव्याने समाविष्ट होणाऱ्या १०८ रुग्णवाहिकांवर ऑनलाइन नोंदणीसाठी क्यूआर कोड लावण्यात यावा. तसेच रुग्णवाहिकांवरील डॉक्टर व पायलट यांना अवयवदानासंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, असेही निवेदनात सुचविण्यात आले आहे.
‘अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून माणुसकीची चळवळ आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे केवळ जनजागृती न करता सक्षम शासकीय यंत्रणा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे आवश्यक आहे,’ असे डॉ. अशोक गावित्रे यांनी नमूद केले आहे.
शासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून महाराष्ट्रात अवयवदान, नेत्रदान, त्वचादान व देहदानासाठी स्वतंत्र जनजागृती आणि समुपदेशन धोरण राबवावे, अशी अपेक्षा डॉ. गावित्रे यांनी व्यक्त केली आहे.



