महिलांच्या इच्छाशक्तीपुढे अशक्य काही नाही- भाऊसाहेब वाघ
महिलांच्या इच्छाशक्तीपुढे अशक्य काही नाही- भाऊसाहेब वाघ
श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव महाविद्यालयातील महिला कल्याण व स्त्री सबलीकरण समिती आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिलादिनानिमित्त, ‘एक दिवशीय सौंदर्य प्रसाधन अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि ६ मार्च २०२४– “उंच आकाशात झेपावणाऱ्या घारीला सुद्धा थेंबभर पाण्यासाठी जमिनीवर यावे लागते. पण ही तिची हार नसते, तर तिने नव्या बळाने घेतलेली ती भरारी असते. या घारीसारखेच भारतीय महिलांनी अपयश आले तरी निराशेच्या गर्तेत न जाता आकाशात यशस्वीतेची भरारी घ्यावी”.असे प्रतिपादन नारंदी अॅग्रो फार्मस प्रोड्युसर्स कंपनी लि.चे चेअरमन भाऊसाहेब वाघ यांनी श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव महाविद्यालयातील महिला कल्याण व स्त्री सबलीकरण समिती आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिलादिनानिमित्त, ‘एक दिवशीय सौंदर्य प्रसाधन अभ्यासक्रम कार्यशाळे प्रसंगी बोलताना व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे विज्ञान शाखाप्रमुख प्रा. डॉ. बाबासाहेब वर्पे हे होते.
महिला प्राध्यापक व महाविद्यालयीन युवतींना संबोधित करताना वाघ यांनी सांगितले की,स्पर्धा व बेरोजगारीच्या आजच्या परिस्थितीत मनुष्य समूह नैराश्येच्या गर्दीत अडकला जात आहे ..दिशाहीन होत आहे त्यामुळे कुटुंबाचा व समाजाचा आधारवड असलेल्या महिलांनी निराश न होता समाजाला व कुटुंबाला दिशा देण्याचे कार्य करावे. हे सांगताना त्यांनी , पराभवाने खचून न जाता परत जिंकणाऱ्या इंदिरा गांधी, आणि वैयक्तिक आयुष्यात संघर्ष करून यशस्वी उद्योजक बनलेल्या उद्योग महर्षी धीरूभाई अंबानी यांचा जीवनपट उलगडून दाखवला.धीरूभाई स्वकष्टाने व हिमतीने १४ व्या वर्षी बाहेर पडून समोर आलेल्या समस्यांना धैर्याने सामोरे जात त्यांनी दुनियेला मुठीत घेण्याचे स्वप्न पाहिले याचे कारण प्रचंड इच्छाशक्तीच असे सांगत त्यांनी एक प्रकारे महिलांच्या डोळ्यात अंजन घातले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या मार्गदर्शक ताराराणी मल्टीट्रेड अॅण्ड सर्विसेस प्रा.लिमिटेड च्या संचालिका जयश्री रोहमारे यांनी शासन महिला विकासासाठी राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.त्यातील एक अशा ब्युटीपार्लर कोर्सचे महिलाच्या जीवनातील महत्त्व व रोजगाराच्या संधी याविषयी सविस्तर सांगितले.अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. वर्पे यांनी आयर्न लेडी म्हंटल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी पासून सारख्या खेड्यातील सामान्य महिलांपर्यंतची काही उदाहरणे देऊन महिलांमधील कर्तृत्वशक्तीचा परिचय घडविला. तसेच २१ व्या शतकामध्ये महिलांना अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत हेही आवर्जून त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर प्रतिमा पूजनाने झाली. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय महिला कल्याण व स्त्री सबलीकरण समितीच्या चेअरमन डॉ. उज्वला भोर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून ८ मार्च हा महिला शक्ती व अधिकार जाणीव जागृतीचा दिवस असल्याचे सांगून, महिलांच्या कर्तुत्वाची जाणीव करून देऊन कार्यशाळेचा उत्साह वाढवला. डॉ.सीमा चव्हाण यांनी सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले सदर कार्यशाळेसाठी उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ.रंजना वर्दे यांनी व्यक्त केले. कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. सानप व कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम महिला प्राध्यापक, महिला शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.