रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारात माजी खासदार काळे साहेब व माजी मंत्री कोल्हे साहेब यांचे योगदान अतुलनीय
रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारात माजी खासदार काळे साहेब व माजी मंत्री कोल्हे साहेब यांचे योगदान अतुलनीय
कोपरगाव हे शिक्षणाचे माहेरघर आहे- चंद्रकात दळवी
कोपरगाव विजय कापसे दि २७ सप्टेंबर २०२४ “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वयाच्या २२ व्या वर्षी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारात माजी.खासदार आणि केद्रीय मंत्री शंकररावजी काळे साहेब व माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांचे योगदान अतुलनीय आहे. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार २५ वर्षे चेअरमनपदी असतांना खऱ्या अर्थांने काळेसाहेबांच्या कारकिर्दीत झाला. त्यामुळे कोपरगाव हे शिक्षणाचे माहेरघर बनले”. असे उद्गार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकात दळवी यांनी काढले. ते पुढे म्हणाले की, “ कोपरगाव तालुका हा प्रगतीची कास धरणारा तालुका आहे. काळे साहेबांनी आपल्या जीवनामध्ये अण्णांचे विचार आत्मसात करून कोपरगाव तालुक्याचा शैक्षणिक विकास केलेला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीमध्ये काळे साहेब व कोल्हे साहेब यांच्या इतकेच रयत सेवकांचे योगदान देखील महत्त्वपूर्ण आहे. वर्तमान काळामध्ये शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी इंटरपॅनल बोर्ड बसविणे आवश्यक आहे व आधुनिक काळात शिक्षणात होणारे तांत्रिक बदल,स्पर्धा परीक्षा, अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षांना सामोरे जाण्यास प्रत्येक रयत विद्यार्थी तयार आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा, या दृष्टीने रयत शिक्षकांनी शैक्षणिक क्रांतीची आव्हाने स्वीकारले पाहिजे. कर्मवीरांच्या विचाराचा वसा वारसा विद्यार्थ्यांनी जोपासायला हवा. सर्व स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवत आपल्यामधील सुप्त गुणांचा विकास करत आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असला पाहिजे. तंत्रज्ञानाचा हात हाती घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा विकास साधत शिक्षणाचा दर्जा उंचवावा”
येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स,गौतम आर्ट्स अँण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, पद्मा मेहता प्राथ. कन्या विद्यामंदिर डॉ. सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर, कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय कोपरगाव ,या पाच शाखांच्या वतीने नुकताच १३७वा कर्मवीर जयंती सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकात दळवी बोलत होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व अश्वमेध कृषी ग्रुपचे संस्थापक ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी “कर्मवीरांच्या विचाराचे मंथन करून त्यांचा अंगीकार केल्यास उज्वल यशाचे शिखर विद्यार्थ्यांसाठी दूर नाही हे तितकेच खरे”असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एस. झेड. देशमुख यांनी “महाराष्ट्राचा इतिहास घडविण्यामध्ये कर्मवीरांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. श्रमाशिवाय शिक्षण नाही हा अण्णांचा महत्त्वपूर्ण विचार आज प्रत्येक रयत विद्यार्थ्यांमध्ये रुजणे महत्त्वाचे आहे” असे प्रतिपादन करत आजच्या वास्तवावर चौफेर दृष्टी वेधली. कर्मवीर प्रतिमा पूजन आणि त्या नंतर सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिरच्या विद्यार्थीनीनी सादर केलेल्या स्वागत गीत व कर्मवीर स्तवनाने आरंभ झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात, “प्रसिद्धीच्या मागे न धावता प्रामाणिकपणे आपले कर्म करत राहणं हीच कर्मवीर भाऊराव पाटील प्रति खरी आदरांजली ठरेल.”असे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोषदादा काळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी जनरल बॉडी सदस्य पद्माकांत कुदळे, कारभारी आगवन, मच्छिंद्र रोहमारे, बाळासाहेब कदम, अॅड. संदीप वर्पे, अरुण चंद्रे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुनील गंगुले, बाळासाहेब आव्हाड, महेंद्रशेठ काले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.तसेच कृष्णा आढाव, विरेन बोरावके व रयत शिक्षण संस्थेतील उत्तर विभागाचे पदाधिकारी नवनाथ बोडखे, प्रमोद तोरणे व बाबासाहेब नाईकवाडी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला पाचही शाखांचे शाखाप्रमुख प्र.प्राचार्या डॉ.उज्ज्वला भोर, शहाजी सातव, शेलार प्रमोदिनी, सुभाष दरेकर, नंदकुमार खाडे महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब शेंडगे, डॉ.अर्जुन भागवत, प्रा. संजय शिंदे,वरिष्ठ प्रा. डॉ. मोहन सांगळे, डॉ. बंडेराव तऱ्हाळ, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र.प्राचार्या मा.डॉ.उज्ज्वला भोर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक शहाजी सातव यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सीमा चव्हाण, डॉ.वैशाली सुपेकर, व प्रा.रवींद्र हिंगे यांनी केले. सदर कार्यक्रमप्रसंगी शैक्षणिक संकुलातील सर्व प्राध्यापक,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पाचही शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.