भोजापुर पूरचारीचे १६ कि.मी. दुरुस्तीचे काम सुरू – आमदार थोरात
तालुक्यातील सर्वांना पाणी देण्यासाठी काम, कुणीही वंचित राहणार नाही
सोनोशी येथे पुरचारीच्या कामाचे भूमिपूजन
तळेगाव दिघे विजय कापसे दि १० मार्च २०२४– तळेगाव भागातील गावांना पाणी मिळावे याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भोजापुर पूरचारी करण्यात झाली. दरवर्षी या चारीसाठी कारखान्याच्या वतीने काम केले जात असल्याने काही गावांना पाणी मिळते. या चारीच्या कामात ज्यांचे काही योगदान नाही .ज्यांचा हेतू चांगला नाही. ते लोक या परिसरात येऊन मनभेद निर्माण करत आहेत. अशांना थारा देऊ नका असे सांगताना आता नव्याने सोनेवाडी ते तिगाव माथा हे 16 किमी दुरुस्तीचे काम सुरू होणार असून येणाऱ्या काळात पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही सर्वांना पाणी मिळेल यासाठी काम केले जात असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
तिगाव वटमादेवी येथे भोजपूर पूरचारीच्या 2 कोटी 12 लाख निधी मधून 16 किलोमीटर लांबीच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी समवेत मा.आ.डॉ सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, बाबासाहेब ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, बी आर चकोर, गणपतराव सांगळे, संपतराव गोडगे ,नवनाथ आरगडे, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, सुभाष सांगळे ,सौ केशरबाई सानप, भाऊसाहेब गीते ,रमेश सानप, सरपंच सुदाम गीते जलसंधारण विभागाचे अभियंता सुरेश मंडलिक आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, कारखान्याच्या वतीने 85 लाख रुपये निधीतून भोजापुर चारी करण्यात आली. आपण जलसंधारण मंत्री असताना ही चारी त्या खात्याकडे वर्ग केली. दरवर्षी कारखान्याच्या मदतीतून पाणी आणण्यासाठी काम केले जात आहे. ज्या लोकांचे कोणतेही योगदान नाही. त्यांचा हेतू चांगला नाही अशी लोक या भागांमध्ये येऊन मनभेद निर्माण करत आहेत .त्यांचा उद्देश ओळखा. त्यांनीही 35 वर्ष प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी काय काम केले हा मोठा प्रश्न आहे.
सत्ता आल्याने ते अडवणूक करत आहेत .खोटेनाटे केस करून तालुक्यात दडपशाही निर्माण करू पाहत आहेत.काही खबरे काम करत आहेत.त्यांना थारा देऊ नका.संगमनेर तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी 77 कोटी रुपयांचा निधी मिळवला. या सरकारने त्याला स्टे लावला सुप्रीम कोर्टातून स्टे उठवला आता चिंचोली ते मालदाड रस्त्याचे कामही सुरू आहे. तालुक्यातील सर्व गावांना पाणी दिले जाणार आहे कुणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही असे सांगताना सध्याचे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी होत असल्याचेही ते म्हणाले.
अनेक लोक पक्ष बदलतात पक्ष बदलणे म्हणजे ज्या आईने वाढवले लहानचे मोठे केले त्या आईला विसरण्यासारखे आहे.लोकशाही धोक्यात आली आहे, ईडीसीबीआयचा धाक दाखवला जात आहे. खोके सरकार, त्यामध्ये असलेली दुफळी आता उघड झाली आहे. धार्मिकतेच्या नावावर राजकारण केले जात आहे. विकासाचा कोणताही मुद्दा त्यांच्याकडे नाही. मणिपूर मध्ये महिलांवर अत्याचार झाला राष्ट्रीय कुस्तीगीर महिलापटूवर अत्याचार झाला. त्यावेळेस सरकार गप्प होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची घेणेदेणे नाही. दिल्लीच्या वेशीवर आलेल्या शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकले, त्यांच्यावर अश्रूधूराचा मारा केला. हे अत्यंत दुर्दैवी आहे.
महाराष्ट्रात अशा राजकारणाला थारा नसून आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, सध्या लोकशाही धोक्यात आली आहे. देशात भीतीचे वातावरण आहे. अनेक जण भविष्याच्या घोषणा करतात. मात्र त्यांचा भूतकाळ पहा. येणारा काळ हा निवडणुकीचा असून अनेक भुलथापा दिल्या जातील. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी अशा भूलथापांना बळू पडू नका असेही ते म्हणाले.
तर कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुक्याला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. हाच वारसा आपल्याला जोपायचा आहे. सतत चांगले काम करा हे तत्व साहेबांनी आपल्या सर्वांना दिले आहे.साहेबांनी कधीही कुणाचे वाईट केले नाही. तरुणांनी सर्वांनी एकत्र येऊन ही विकासाची वाटचाल पुढे न्यायची असून गाव तेथे युवक काँग्रेसच्या शाखा सुरू करणार असल्याच्या त्या म्हणाल्या.
यावेळी शेती संघाचे संचालक सचिन दिघे, बी.आर. चकोर पांडुरंग फड यांनीही आपली मनोगती व्यक्त केली.यावेळी बाबासाहेब कांदळकर, अनिल कांदळकर, साहेबराव गडाख, त्र्यंबक गडाख, शंकर ढमक,शेखर वाघ, अनिल घुगे, बाबासाहेब कडनर ,विलास सोनवणे, राजेंद्र मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे, सखाराम शरमाळे, किसनराव सुपेकर आदींसह परिसरातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश सानप यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर शंकर ढमक यांनी आभार मानले
राज्य पातळीवरही संगमनेरचा सन्मान
महाविकास आघाडीच्या जागावाटप, न्याय यात्रा ,लोकसभा निवडणूक जागावाटप अशा सर्व प्रक्रियांमध्ये आपला समावेश होत असून विधानसभेतही सर्वपक्षीय आमदार आदर करतात. सुसंस्कृत राजकारण आणि सर्वांना बरोबर घेण्याची आपली पद्धत आहे. यामुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपला नव्हे तर संगमनेर तालुक्याचा सन्मान होत असून वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी तत्व व विचारांवर काम करणारे आमदार बाळासाहेब थोरात यांचे व्यक्तिमत्व असल्याचेही म्हटले असल्याचेही आमदार थोरात यांनी सांगितले आहे. यावेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.