के.जे.सोमैया महाविद्यालयात योग प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन
के.जे.सोमैया महाविद्यालयात योग प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन
के.जे.सोमैया महाविद्यालयात योग प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन
कोपरगाव विजय कापसे दि १६ मार्च २०२४– कोपरगाव येथील के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला महिन्याचे औचित्य साधून फिलिपीन्स येथील युनिव्हर्सिटी ऑफ परपिच्युअल हेल्प सिस्टीम डाल्टा मधील महिला प्राध्यापक आणि विद्यार्थिनींसाठी योग प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली. याप्रसंगी युनिव्हर्सिटी ऑफ परपिच्युअल च्या आंतरराष्ट्रीय लिंकेज ऑफिसर डॉ. मीरा रमिरेज, प्रिन्सिपॉल डॉ. मारीबेल ऑर्डनेझ, प्रशासकीय अधिकारी श्रीमती कथेरीने सिंनको, आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रो. (डॉ) विजय ठाणगे, सामंजस्य कराराचे व या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. रवींद्र जाधव, योगशिक्षक डॉ. वसुदेव साळुंके, डॉ. सुनील कुटे यांच्यासह युनिव्हर्सिटी ऑफ परपिच्युअल मधील महिला प्राध्यापक व विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
या शिबिराची सुरूवात दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संयोजक डॉ. रवींद्र जाधव यांनी आंतरराष्ट्रीय महिला महिना साजरा करत असतांना महाविद्यालयाने महिलांच्या सन्मानार्थ हे योग शिबिर आयोजित करत असल्याचे सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे योग शिक्षक डॉ. वसुदेव साळुंके यांनी योगाचा इतिहास, योगाचे फायदे, पद्धती व योग जीवनशैली विषद करतांना सूर्यनमस्कार, वृक्षासन, नटराजसन, अर्ध मत्स्येद्रासन, वज्रसन, सर्वांगसन, पवनमुक्तसन, भुजंगासन, धनुरासन इत्यादी योगासनाविषयी माहिती दिली. डॉ.वसुदेव साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय योग खेळाडू प्रज्वल ढाकणे व वैष्णवी ढाकणे या विद्यार्थ्यांनी शिबिरातील उपस्थितांना योगाचे प्रशिक्षण दिले.
याप्रसंगी युनिव्हर्सिटी ऑफ परपिच्युअल च्या डॉ. मीरा रमिरेज व प्रिन्सिपॉल डॉ. मारीबेल ऑर्डनेझ यांनी के.जे.सोमैया महाविद्यालयाने आयोजित केलेल्या योग शिबिराचे कौतुक करतांना आपण यानिमित्ताने आमच्या विद्यापीठातील महिला प्राध्यापक व विद्यार्थिनिंचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला हे सोमैया महाविद्यालयाबरोबर झालेल्या सामंजस्य कराराचे फलित असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्रो.(डॉ.) विजय ठाणगे यांनी आमचे महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कटिबद्ध असते. यासाठी महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विद्यापीठांशी सामंजस्य करार केलेले असून याचाच एक भाग म्हणुन आम्ही आज हे शिबिर आयोजित केले असल्याचे म्हटले. युनिव्हर्सिटी ऑफ परपिच्युअल मधील विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी योगा सर्टिफिकेट कोर्स आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या शिबिराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी श्रीमती कथेरीने सिंनको यांनी तर आभार क्रीडा संचालक डॉ. सुनील कुटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रो.(डॉ.) संजय अरगडे, चेतन धनगे यांनी विशेष परिश्रम घेतले.