ग्रामीण महिलांसाठी कुरडया बनवण्याची नवीन मशीन; अमृतवाहिनीचे डॉ.विजय गडाख यांना भारत सरकारचे पेटंट बहाल
ग्रामीण महिलांसाठी कुरडया बनवण्याची नवीन मशीन; अमृतवाहिनीचे डॉ.विजय गडाख यांना भारत सरकारचे पेटंट बहाल
संगमनेर विजय कापसे दि १७ मार्च २०२४– गुणवत्तेचे माहेरघर ठरलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील ऑटोमेशन व रोबोटिक्स विभागातील असिस्टंट प्रोफेसर डॉ. विजय शिवाजीराव गडाख यांना नूडल्स एक्सट्रुडर यंत्र (कुरडया बनवण्याची नवीन यंत्र) आणि त्याची प्रक्रिया या संशोधनास भारत सरकारच्या कार्यालयाकडून पेटंट मिळाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश यांनी दिली आहे.
प्रा.डॉ.विजय शिवाजी गडाख हे पारेगाव बुद्रुक या गावचे रहिवासी असून ग्रामीण भागातील महिला त्यांचे जीवनमान याची पूर्ण माहिती असून महिलांचे श्रम कमी करण्यासाठी त्यांनी हे नवीन संशोधन केले आहे. बहुतांशी खेडे गावात कुरडई ही सर्वज्ञात आहे. त्यासाठी असलेल्या सोऱ्यांमधून कुरडई बनवली जाते.परंतु गव्हाचा चीक सोऱ्यांमधून दाबण्यासाठी एक व कुरडई चालण्यासाठी किमान तीन ते चार महिला लागतात. आणि यासाठी वेळही खूप लागतो. यावर पर्याय म्हणून डॉ गडाख यांनी नवीन यंत्र बनवले असून या नवीन यंत्र सोऱ्यामध्ये गव्हाचा चीक स्वयंचलित दाबला जातो. तसेच कुरडई देखील स्वयंचलित चाळली जाते .त्यामुळे एका मिनिटात कमीत कमी पाच ते सहा कुरडया तयार केल्या जातात. या संशोधनामुळे महिलांचा वेळ वाचणारा असून कमी वेळेत कमी खर्चात व कमी श्रमात कुरडया तयार होणार असल्याचे डॉ विजय गडाख यांनी सांगितले.
तर अनिल शिंदे म्हणाले की या नवीन संशोधनामुळे ग्रामीण महिलांचा वेळ आणि श्रम वाचणार असून अमृतवाहिनी मधून सातत्याने नवनवीन संशोधनासाठी काम केले जात आहे. या संशोधनात विद्यार्थी ऋषभ मस्के, रमेश मोरे, आकाश केवल , कल्याणी कबाडे व सुरभी हासे यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
या नवीन संशोधनाच्या मिळालेल्या पेटंट बद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ सुधीर तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी गुरव, व्यवस्थापक प्रा. व्ही.बी.धुमाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम ए वेंकटेश ,ऑटोमेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. विलास शिंदे सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.