आमदार आशुतोष काळेकाळे गट

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची ७१ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची ७ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

केंद्र सरकारने साखर उद्योगाबाबत शाश्वत धोरण राबविणे गरजेचे – आ. आशुतोष काळे

दिवाळी गोड करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दसऱ्यानंतर लगेच प्र.मे.टन रुपये १२५ देणार

जाहिरात

 कोपरगाव विजय कापसे दि ३१ ऑगस्ट २०२४ :- २०२३-२४ च्या गळीत हंगामात साखर कारखानदार, राज्य सरकार व केंद्र सरकार यांचे सर्वांचेच साखर उत्पादना विषयीचे अंदाज चुकले. केंद्रीय अन्नपुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने (दि. ७) डिसेंबर २०२३ रोजी नोटिफिकेशन काढून केंद्र शासनाने बी हेवी व डायरेक्ट ज्युस अथवा सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्यामुळे साखर उत्पादनात वाढ झाली. एकीकडे इथेनॉल निर्मिती करीता नवीन डिस्टीलरी उभारणीस प्रोत्साहन द्यायचे तर दुसरीकडे फक्त सी हेवी पासूनच इथेनॉल निर्मिती करणे बाबतचा आग्रह धरायचा हे साखर उद्योगाबाबतचे धोरण कुठेतरी विसंगती निर्माण करणारे आहे. साखरेची गरज लक्षात घेता पुढील हंगाम सुरु करण्यापूर्वी देशात ६०.०० लाख मे.टन साखर साठा शिल्लक असणे आवश्यक असतांना हा साठा जवळपास ८२.०० लाख मे.टन असून २२.०० लाख मे.टन जास्तीच्या शिल्लक साखरेस निर्यातीस अथवा इथेनॉल निर्मितीस मान्यता दिली असती तर साखरेच्या दरात काही प्रमाणात वाढ होवून साखर कारखानदारीला निश्चितपणे दिलासा मिळाला असता. त्यामुळे साखर कारखानदारीला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी केद्र सरकारने साखर उद्योगाबाबत शाश्वत धोरण राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

जाहिरात

 सहकार क्षेत्रातील प्रगतीच्या शिखराकडे जोमाने वाटचाल करीत असलेल्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची ७१ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक व संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्न झाली.या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षीय पदाची सूचना ज्ञानदेव मांजरे यांनी मांडली सदर सूचनेस बाळासाहेब जपे यांनी अनुमोदन दिले. व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले. सभेसाठी सभासद मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. यावेळी शॉट सर्किटमुळे ऊस जळालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

जाहिरात

आपल्या भाषणात पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, देशाची साखर निर्यात धोरणांमध्ये अनिश्चितता आहे. २ वर्षापुर्वी ११० लाख मे.टन, त्यानंतर ६० लाख मे.टन साखर निर्यात करण्यात आली परंतु मागील वर्षात काहीच साखर निर्यात झाली नाही, त्यामुळे आंतरराष्ट्रीय साखर व्यापारात भारताची विश्वासार्हता कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. नुकताच केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाबाबत लादलेले निर्बंध काढून टाकले आहे त्यामुळे ऊसाचा रस शुगर सिरप, बी हेवी मोलॅसेस इथेनॉल उत्पादनाकडे वळविता येईल हा निर्णय स्वागतार्ह असून त्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. केंद्र शासनाने सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सहकारी साखर कारखान्यांनी ऊसाला एसएमपी/एफआरपी पेक्षा जादा अदा केलेल्या ऊस दराला मा.केंद्र किंवा राज्य शासनाची अंतिम ऊस दर म्हणून मान्यता असल्यास व्यावसायिक खर्च म्हणून परिगणना करण्यास मान्यता दिली. त्याकरीता कायद्यात देखील बदल केला. प्राप्तीकर संदर्भात केंद्र शासनाने घेतलेल्या या महत्वपुर्ण निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. २०२३-२४ या आर्थिक वर्षात कारखान्यास निव्वळ नफा रुपये ३ कोटी १३ लाख ८४ हजार इतका झालेला असून ३१ मार्च २०२४ अखेर एकूण संचित नफा २७ कोटी ३१ लाख असून ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला असल्याचे सांगितले. २०२३-२४ च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल प्र.मे.टन २,८२५/-रुपये, जूनमध्ये प्र.मे.टन १००/-रुपये व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पुन्हा प्र.मे.टन १२५/-रुपये याप्रमाणे प्र.मे.टन ३०५०/- रुपये सर्वाधिक दर दिला आहे. तसेच या व्यतिरिक्त मार्च महिन्यात गाळपास आलेल्या ऊसाला प्र.मे.टन ५०/-रुपये व एप्रिल महिन्यात ७५/- रुपये प्र.मे.टन अनुदान दिले असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात

 यावेळी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणा-या सभासद शेतक-यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला यामध्ये आडसाली- भास्करराव धोर्डे, डोणगाव, पूर्व हंगामी-जमालभाई सय्यद, भरतपूर, सुरु-साहेबराव घुले, भरतपूर, खोडवा-मारुती केदार, बक्तरपूर या शेतक-यांचा समावेश होता. सभेचे सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले. अहवाल वाचन प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले. यावेळी विषय पत्रिकेवरील १ ते १३ विषय सर्व सभासदांकडून टाळ्यांच्या गजरात वर हात करून एकमताने मंजूर करण्यात आले. आभार संचालक सूर्यभान कोळपे यांनी मानले.

याप्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, व्हा. चेअरमन शंकरराव चव्हाण, तसेच माजी संचालक बाळासाहेब कदम, ज्ञानदेव मांजरे, विश्वासराव आहेर,पद्माकांतजी कुदळे, चंद्रशेखर कुलकर्णी, कारभारी आगवण, काकासाहेब जावळे, वसंतराव दंडवते, बाबासाहेब कोते, नारायण मांजरे, आनंदराव चव्हाण, एम.टी. रोहमारे, राजेंद्र गिरमे,  मुरलीधर थोरात, अॅड. शंतनू धोर्डे, अॅड.विद्यासागर शिंदे, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, तसेच सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक,पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापती,सदस्य,नगरपालिकेचे सदस्य, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ आदींसह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दसऱ्यानंतर लगेच प्र.मे.टन रुपये १२५ देणार ——

 कारखान्याची गाळप क्षमता वाढविली आहे. जास्तीत जास्त ऊस गाळपाकरीता कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवडी होणे गरजचे आहे. दरवर्षी १० लाख मे.टन ऊस गाळप होणे आवश्यक असून आपल्याला स्पर्धा स्वतः बरोबरच करायची आहे. ऊस दराची चिंता करुन नका. आपल्या कारखान्यास प्रथम प्राधान्य देऊन उपलब्ध असलेला संपूर्ण ऊस गाळपास दयावा.संस्थेची प्रगती आणि सभासद-शेतक-यांची आर्थिक उन्नती हि कर्मवीर शंकरराव काळे साहेबांची शिकवण आम्ही सदैव पाळत आलो आहे आणि यापुढे देखील पाळत राहणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायची असून २०२३-२४ गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला प्र.मे..टन रुपये १२५/- प्रमाणे दसऱ्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे जाहीर करून जिल्ह्यात सर्वाधिक रुपये ३०५०/-ऊस दर देण्याची परंपरा कायम राखली आहे.

 

पाणी वळविण्याचा शब्द उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार पूर्ण करतील —–

 कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या आदर्श विचारांवर व मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याबरोबरच मतदार संघाच्या विकासाची वाटचाल सुरु आहे. नुसते आमदार म्हणून मिरविण्यात मला स्वारस्य नाही. आपण माझ्याकडे यायचे आणि मी तुम्हाला आश्वासन देवून वेळ मारून न्यायची हे मला कधी जमले नाही, जमणार पण नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कुणाची, सरपंच कुणाचा याचा कधीही विचार न करता विकासकामांना निधी दिला. राष्ट्रीय महामार्गापासून ते गल्ली व शिवार रस्त्यांसाठी जवळपास ७५० कोटी निधी दिला. उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य विभागाला बळकटी दिली. शहा येथील २३२ कोटीच्या सबस्टेशन मधून मतदार संघातील सबस्टेशन जोडले जाणार आहे. ब्राम्हणगाव, चांदेकसारे सबस्टेशन मंजूर करून आणले तर काही सबस्टेशनची क्षमता वाढवून विजेच्या बाबतीत मतदार संघ सक्षम केला.राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार एकाच महिन्यात दोन वेळेस आपल्याकडे आले. त्यांनी पश्चिमेला समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी आश्वासित केले आहे. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करतील याचा मला विश्वास आहे. त्यामुळे मतदार संघातील उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा आशीर्वाद देणार का? असे आवाहन करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे