इस्रो’ सहली वरून परतलेल्या ओगदी व जवळके शाळेच्या विद्यार्थीनीचे कोपरगावात जंगी स्वागत
ओगदी जिल्हा परिषद शाळेच्या २ व जवळके जिल्हा परिषद शाळेची १ अशा ३ विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या
कोपरगाव विजय कापसे दि २१ डिसेंबर २०२४- जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, संशोधनाची जिज्ञासा निर्माण व्हावी, वैज्ञानिक क्षेत्रातील विविध संधींची ओळख व्हावी म्हणून डॉ.विक्रम साराभाई स्पेस सेंटर (थुंबा) केरळ येथे नुकतीच जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी विद्यार्थ्यांना विमानवारी घडवून आणली.यात कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या ३ विद्यार्थी सहभागी झाल्या होत्या त्या नुकत्याच कोपरगावात आल्या असता कोपरगाव पंचायत समितीच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या पुढाकारातून इस्रो सहलीचे सोमवार दिनांक १६ डिसेंबर ते शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय परीक्षेतून जिल्ह्यातील एकूण ४२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.यामध्ये कोपरगाव तालुक्यातून ३ विद्यार्थीनी निवडल्या गेल्या होते. त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओगदी ता.कोपरगाव या शाळेच्या गीता दशरथ जोरवर व अनन्या वाल्मीक बागल तर जवळके शाळेची अमिता थोरात या ३ विद्यार्थीनीना सहलीला जाण्याचा मान मिळाला. संपूर्ण सहलीचे नेतृत्व जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केले.
सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी बेंगलोर येथील सर विश्वेश्वरय्या म्युझियमला भेट दिली. तसेच डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर (थुंबा) केरळ येथे रॉकेट लॉन्चिंग ,त्रिवेंद्रम येथील प्राणी संग्रहालय व मत्स्यालय विद्यार्थ्यांना पाहायला मिळाले. विमान प्रवासाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. जिल्हा परिषद ओगदी शाळेच्या विद्यार्थिनींनी या सहलीची संधी मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचे आभार मानले . या स्वागत प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.