आपला जिल्हा
गोदावरी नदी पात्रात कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला बालकाचा मृतदेह
गोदावरी नदी पात्रात कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला बालकाचा मृतदेह
चासनळी येथील निंदनीय घटना
कोपरगाव विजय कापसे दि २१ डिसेंबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रात एका अज्ञात गुन्हेगाराने अंदाजे ५ ते ६ वर्षीय मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह पांढऱ्या कापडात गुंडाळून नदीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपात्रामध्ये शुक्रवार दि २० डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारासं नदीकाठी गेलेल्या काही स्थानिकांना संशयास्पद वस्त्र नदीमध्ये तरंगताना आढळले. जवळ जाऊन पाहिल्यानंतर पांढऱ्या कापडात गुंडाळलेला मृतदेह असल्याचे समजले. घाबरलेल्या नागरिकांनी तालुका पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर तत्काळ कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.
प्राथमिक तपासात मृत मुलाच्या शरीरावर जखमा सदृश्य निशाण असल्याचे आढळले आहे त्यामुळे सदर बालकाची हत्या कोणी केली? कशासाठी केली? नरबळीचा प्रकार तर नसेल ना? असे तर्क वितर्क प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे.
सदरचा मृतदेह हा अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, ज्यातून पुढील तथ्ये उघड होण्याची शक्यता आहे.घटनेची गांभीर्याने दखल घेत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी घटनास्थळी भेट देत तपासाचे चक्र वेगाने फिरवले असुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, मृताच्या कुटुंबीय व स्थानिक नागरिकांची चौकशी केली जात आहे.ही घटना समजल्यावर परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांनी या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
पाहणी करतांना पोलीस अधिकारी
या घटनेने पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षिततेबाबत समाजाला अंतर्मुख केले आहे. पालकांनी आपली मुले सुरक्षित असल्याची खात्री करावी, तसेच मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना या प्रकरणात कोणतीही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अफवा पसरवून तपासात अडथळा निर्माण न करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या निर्दयी घटनेतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी असून पोलीस यावर ठाम कारवाई करतील असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.