कोपरगाव विजय कापसे दि २१ डिसेंबर २०२४– कोपरगाव येथील गेल्या २९५ आठवड्यापासून अविरतपणे गोदावरी नदीची स्वच्छता करत असणाऱ्या गोदामाई प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर यांना नुकताच जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलप्रहरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ब चिन्मय उदगीरकर हे मराठीसृष्टीतलं एक मोठं नाव असून ते गेल्या पंधरा वर्षापासून गोदावरी नदी अविरल निर्मल स्वच्छ सुंदर वाहण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासोबतच नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी अनेक माध्यमातून जनजागृती करत आहे. प्रसिद्ध ब्रह्मगिरी डोंगर हा वाचला पाहिजे यासाठी त्यांनी हजारो देशी वृक्ष डोंगरावर लावली आहेत ब्रह्मगिरीवरून जे पावसाचे पाणी वाहून जाते त्याला छोटे छोटे बंधारे करून ते जमिनीमध्ये कसं मुरवता येईल यासाठी ही त्यांनी प्रयत्न केलेले आहे. तसेच आजच्या युवा पिढीला निसर्ग संवर्धनाचे महत्व कळावे या साठी अनेक शाळा महाविद्यालयात जनजागृती साठी मार्गदर्शन देखील केले आहे.
आदी सर्व कामाची दखल घेत गोदामाई प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध सिनेअभिनेते चिन्मय उदगिरकर यांना नुकताच देशाची राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र भवनामध्ये जलशक्ती मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री राजभूषण चौधरी यांच्या शुभहस्ते ‘जलप्रहरी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या प्रसंगी आतंरराष्ट्रीय ख्यातीचे जलपुरुष डॉ राजेंद्र सिंह, गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे आदी उपस्थित होते.