शिर्डीत २४ व २५ डिसेंबरला तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे आयोजन
शिर्डीत २४ व २५ डिसेंबरला तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे आयोजन
शिर्डीत २४ व २५ डिसेंबरला तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे आयोजन
शिर्डी विजय कापसे दि २१ डिसेंबर २०२४ – आपल्या राजे-महाराजांनी मंदिरांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांचे संरक्षण केले, तसेच आक्रमकांनी उद्धस्त केलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले. आज मात्र भारताने ‘सेक्युलर’ वादी राज्यव्यवस्था स्वीकारल्यामुळे केवळ मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या मंदिरांचा भ्रष्टाचार, पैसे घेऊन ‘व्ही.आय.पी.’ दर्शन, मंदिरांची भूमी बळकावणे, ‘वक्फ बोर्ड’चे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण चालू आहे. अशा वेळी मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे हे हिंदु समाजाचे दायित्व आहे. एकूणच मंदिरांच्या समस्यांचे निवारण करणे, मंदिरात येणार्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, दर्शनरांगांचे सुनियोजन करणे, तसेच मंदिर परंपरांचे रक्षण करणे यांसाठी मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, भक्त आदींचे संघटन आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ, मुंबई येथील श्री जिवदानी देवी संस्था, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान, श्री साई पालखी निवारा आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि २४ डिसेंबर व बुधवार दि २५ डिसेंबर २०२४ या दिवशी श्री साई पालखी निवारा, नगर-मनमाड रोड, निमगांव, शिर्डी येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून १ हजार हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘मंदिर महासंघा’चे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला मालेगाव येथील वैजनाथ महादेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष निवृत्त सेना अधिकारी मेजर किसन गांगुर्डे, नाशिक गोरेराम मंदिराचे मालक दिनेश मुठे, साई पालखी निवारा शिर्डीचे कार्यालयीन व्यवस्थापक स्वप्नील शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक प्रदीप देशमुख उपस्थित होते.
या वेळी सुनील घनवट पुढे म्हणाले, ‘‘फेब्रुवारी २०२३ जळगाव येथे पहिल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर ओझर, पुणे येथे दुसरी परिषद झाली. त्यानंतर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून दोन वर्षांच्या आत ते संपूर्ण राज्यभर पोचले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून राज्यात ८०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्रसंहिता लागू करण्यात आली आहे, तर १५ हजारांहून अधिक मंदिरांचे देशभरात संघटन झाले आहे.’’
गोरेराम मंदिराचे मालक श्री. दिनेश मुठे म्हणाले ‘‘या परिषदेला ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु जैन, स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, जय महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे, जैन मंदिराचे गिरीश शहा, मंदिर क्षेत्रात कार्यरत डॉ. अमित थढाणी, मंदिर क्षेत्रात कार्यरत लेखक-अभ्यास संदीप सिंह, बाणगंगा ट्रस्टचे ऋत्विक औरंगाबादकर यांसह अष्टविनायक मंदिरांचे विश्वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्वस्त, संत पिठांचे प्रतिनिधी, अन्य मंदिरांचे विश्वस्त, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.’’ या मंदिर परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन, मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे. ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून यामध्ये सहभागी होण्यासाठी ७०२०३८३२६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर महासंघाने केले आहे.