नागरिकांना अपेक्षित असलेला विकास केला -आ.आशुतोष काळे
नागरिकांना अपेक्षित असलेला विकास केला -आ.आशुतोष काळे
कोपरगाव शहरात ४५ लक्ष रुपये निधीतून विविध विकास कामे सुरु
कोपरगाव विजय कापसे दि २३ सप्टेंबर २०२४ – कोपरगाव मतदार संघासह शहरातील नागरिकांना विकासाच्या बाबतीत मोठ्या अपेक्षा होत्या. त्यामुळे नागरिकांनी त्यांना ज्या प्रमाणे रस्त्यांच्या मजबुतीकरणाचे काम अपेक्षित होते त्याप्रमाणात निधी देवून दर्जेदार कामे कसे होतील याला प्राधान्य देवून नागरिकांना अपेक्षित असलेला विकास केला असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव शहरात ४५ लक्ष रुपये निधीतून प्रभाग क्र.३ मध्ये व्यापारी धर्मशाळा दक्षिण बाजू रस्ता काँक्रीटीकरण करणे, ठक्कर घर ते साईबाबा मंदिर रस्ता काँक्रीटीकरण करणे, प्रभाग क्र. ७ मध्ये वसीमखाटीक घर ते शकील शेख घर रस्ता मजबुतीकरण करणे व प्रभाग क्र. ८ मध्ये फकिर कुरेशी ते हाजी मंगल कार्यालय रस्ता डांबरीकरण करणे आदी कामांचे आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले की, कोपरगाव शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याबरोबरच कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविणे देखील तेवढेच महत्वाचे होते. त्यामुळे केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना जनतेच्या आशीर्वादाने यश मिळत गेले आणि पाणी प्रश्नाबरोबरच शहराचा सर्वांगीण विकास करू शकलो आणि ते देखील जनतेच्या मनाप्रमाणे करू शकलो याचे मोठे समाधान आहे. ५ नंबर साठवण तलाव पूर्ण झाल्यामुळे पाणी साठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आजही आपण नागरिकांना दररोज पाणी देवू शकतो परंतु त्यासाठी सर्व नागरिकांनी आपले नळ कनेक्शन नवीन पाईप लाईनवर जोडणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या तीन दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करण्यात येत असून एक ते चार साठवण तलावाचे काम हाती घ्यायचे आहे. पाण्याच्या टाक्या व उर्वरित वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण होताच नियमित पाणी देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यापारीअसोसिएशनच्या मनोगत व्यक्त करतांना प्रतिष्ठीत व्यापारी यांनी सांगितले की, आम्हाला ज्या रस्त्यांची कामे होणे अपेक्षित होते त्या रस्त्यांबाबत आ. आशुतोष काळे यांना सांगितले असता त्यांनी त्याबाबत कार्यवाही करून निधी उपलब्ध करून दिल्यामुळे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. पाणी प्रश्न देखील सुटला आहे. त्यामुळे निश्चितच व्यवसाय वृद्धी होण्यास मदत होणार आहे. महिलांनी सांगितले की, बऱ्याच दिवसापासूनचा रस्त्यांचा विषय मार्गी लागला याचा आनंद आहे परंतु आमच्याकडे कधी आठ दिवस कधी पंधरा दिवसांनी येणारे पाणी तीन दिवसांनी येणार याचा आम्हाला विशेष आनंद झाला आहे. महिलांची अनेक दशकांची जी समस्या होती ती बऱ्याच वर्षांनी आ.आशुतोष काळे यांच्यामुळे दूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकरी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.