विकासावर बोलायला काहीच नाही त्यामुळे विरोधकांकडून दिशाभूल-आ.आशुतोष काळे
विकासावर बोलायला काहीच नाही त्यामुळे विरोधकांकडून दिशाभूल-आ.आशुतोष काळे
गोळीबार प्रकरणातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे
कोपरगाव विजय कापसे दि २३ सप्टेंबर २०२४ :- मी आजपर्यंत कधीही चुकीच्या गोष्टींचे समर्थन केलेले नाही आणि करणार देखील नाही. त्यामुळे ज्या दिवशी कोपरगाव शहरात गोळीबार प्रकरण घडले त्याच दिवशी पोलिसांना बाहेरच्या गुंडांना कोपरगाव शहरात थारा देवू नका अशा कडक सूचना दिल्या होत्या. मात्र निवडणुका जवळ आल्यामुळे ज्यांना विकासावर बोलायला काहीच नाही त्यांच्याकडून दिशाभूल करून बदनामी केली जात आहे. मात्र राजकीय पोळी भाजण्याचे त्यांचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाही अशी टीका आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे पत्रकार परिषदेत विरोधकांवर केली आहे.
कोपरगाव शहरात घडलेल्या गोळीबार प्रकरणावर आ. आशुतोष काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करून विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.ते म्हणाले की, कोपरगाव शहराच्या विकासासाठी आजपर्यंत साडे तीनशे कोटी निधी आणला असून कोपरगाव शहराच्या विकासाबरोबरच वर्षानुवर्षापासूनचा प्रलंबित असलेला अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न देखील सुटला आहे. व भूमिगत गटारीसाठी देखील ३२३ कोटी निधीला तांत्रिक मंजुरी मिळून हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर झाला आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या विकासासाठी जवळपास ७०० कोटी निधी मिळणार आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या विकासासाठी एवढा मोठा निधी आला असतांना बोलायला काहीच नसलेल्या विरोधकांकडून गोळीबार प्रकरणातून चुकीचे आरोप केले जात आहे.
कोपरगाव शहराची शांतता अबाधित रहावी यासाठी गोळीबार प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शासन झालेच पाहिजे हि माझी स्पष्ट भूमिका आहे. याबाबत सत्य परिस्थिती पोलीस चौकशीतून बाहेर येणारच आहे. मात्र गर्दीत एखाद्या व्यक्तीने ज्या व्यक्तीला मी ओळखत नाही त्या व्यक्तीने माझ्या समवेत फोटो काढण्यासाठी मागणी केल्यावर मी त्याला नाही म्हणू शकत नाही आणि ती व्यक्ती गुन्हेगारी वृत्तीची आहे हे काही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लिहिलेले नसते.त्यामुळे एखाद्या व्यक्तीने माझ्या सोबत फोटो काढल्यानंतर जर ती व्यक्ती गुन्हेगारी वृत्तीची असल्याचे दिसून आले तर त्याचा गैर अर्थ काढून खोटे आरोप करणे चुकीचे आहे.सोशल मिडियाचा जमाना आहे कोणी कुणाचा फोटो वापरायचा आणि त्या फोटोखाली काय मजकूर लिहायचा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे.
ज्यांच्याकडे पद आहे आणि ज्यांच्याकडे पद नाही अशा सगळ्यांनाच कायदा सारखाच आहे. चौकशीमध्ये सर्व काही निष्पन्न होणारच आहे. आरोपीच्या जबाबात माझ्या ऑफिसच्या लोकांवर आरोप लावले असतील तपासामध्ये जर कुठली गोष्ट त्या ठिकाणी आढळली तर कारवाई होईलच मात्र विरोधकांनी त्यात राजकारण आणू नये. त्यांनी खरे तर विकासावर बोलायला पाहिजे मात्र त्याच्याकडे विकासावर बोलायला काही राहिलेच नाही. त्यामुळे अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करून नागरीकांची दिशाभूल करायची आणि बदनामी करायची असा प्रकार सुरु असून निवडणूक जवळ आल्या की, अशा प्रकारच्या गोष्टी होतात याचा नागरीकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.
नागरिकांनी मला संधी दिली. त्या संधीचे सोने करतांना जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. सर्वात महत्त्वाचा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. रस्ते, शासकीय इमारती, पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहत, न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय व्यापारी संकुल, नगरपालिकेची इमारत अशी महत्वपूर्ण विविध कामे या पाच वर्षांमध्ये पूर्ण झाली आहे यावर चर्चा केली पाहिजे. विकासाचे अजूनही प्रश्न आहे मात्र जाती-धर्माचे भांडणातून काहीही साध्य होणार नाही फक्त द्वेष निर्माण करण्याचं काम होईल. नागरिकांच्या विकासाच्या अडचणी कशा कमी करता येतील व बेरोजगारी कशी कमी करता येईल यासाठी काम करायचे असून त्यासाठी एमआयडीसी मंजूर करून आणलेली आहे. परंतू यावर विरोधक चर्चा न करता नागरीकांची दिशाभूल करण्यात धन्यता मानत असले तरी यातून काहीही साध्य होणार नसून चुकीच्या पद्धतीने बदनामी केल्यास दावा ठोकू असा ईशारा आ.आशुतोष काळे यांनी यावेळी विरोधकांना दिला.