संजीवनी फार्मसीच्या तीन विद्यार्थ्यांची तैवान विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्तीसह इंटर्नशिप साठी निवड

संजीवनी फार्मसीच्या तीन विद्यार्थ्यांची तैवान विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्तीसह इंटर्नशिप साठी निवड
संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन विभागाच्या प्रयत्नांचे फलित

कोपरगाव विजय कापसे दि १ मार्च २०२६: संजीवनी शिक्षण संस्थेच्या इंटरनॅशनल रिलेशन विभागाच्या प्रभावी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची तैवान सरकारच्या शिष्यवृत्तीवर तैवानमधील तीन वेगवेगळ्या विद्यापीठांत अनुक्रमे तीन, चार आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप (आंतरवासिता) साठी निवड झाली आहे. या निवडीमुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये संशोधन कार्य करण्याची, आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची तसेच जागतिक स्तरावरील शैक्षणिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की सई प्रकाश रासकर हिची काओशुंग मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये, प्रसाद बाळासाहेब चांदे याची आय-शौ युनिव्हर्सिटी व सर्वेश मयुर जोशी याची नॅशनल चांगहुआ युनिव्हर्सिटी मध्ये अनुक्रमे तीन, चार सहा महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. यापुर्वीही इंटरनॅशनल रिलेशन विभागाच्या प्रयत्नाने रसिया, फिलिपाईन्स, कॅनडा, युके, जपान व तैवान मधिल विविध विद्यापीठांमध्ये संपुर्ण स्कॉलरशिपवर 230 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी तीन ते सहा महिण्यांची इंटरर्नशिप पूर्ण करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढविल्या आहेत.

ग्रामीण भागात कार्यरत असतानाही विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यात संजीवनी संस्था सातत्याने पुढाकार घेत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी निवड झालेले सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार केला. यावेळी पालक वर्षा रासकर, प्रकाश रासकर, अनिता चांदे , बाळासाहेब चांदे, सुप्रिया जोशी , संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, इंटरनॅशनल रिलेशन डीपार्टमेंटचे डीन डॉ. महेंद्र गवळी व याच विभागाच्या समन्वयीका डॉ. प्रेरणा जाधव उपस्थित होते. सदर प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगीतले की, ‘तुम्ही लढा, आम्ही आहे तुमच्या बरोबर आहे’ या शिक्षकांच्या शब्दांनी आम्हाला बळ दिले, आणि आम्ही जिंकलो. ‘सर्व सामान्यांची मुलं यशाच्या मोठ्या उंचीवर जातात, या पेक्षा आम्हाला दुसरे काय पाहिजे’ अशा शब्दात पालकांनी व्यवस्थापनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

मागील चार वर्षांपासून इंटरनॅशनल रिलेशन विभाग सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कार्य करत असून त्याचे यश विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय संधींतून दिसून येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर व्यासपीठ मिळावे, हा संस्थेचा ठाम प्रयत्न आहे. मात्र या संधींचे सोने करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वतः स्वीकारली पाहिजे. संस्थेचे संस्थापक स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची नेहमीच इच्छा होती की ग्रामीण विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले वेगळेपण सिद्ध करावे. त्यांच्या विचारांची पूर्तता करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था वाटचाल करत आहे. इंटर्नशिप दरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करून उत्कृष्ट कामगिरी करावी आणि तैवानमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करावे. परदेशात असताना दररोज पालकांशी संवाद साधावा, तर पालकांनीही कोणतीही चिंता न करता आपल्या मुलांवर आणि संस्थेवर विश्वास ठेवावा.- अमित कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स




