थोरात कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान
थोरात कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान
संगमनेर विजय कापसे दि २५ ऑक्टोबर २०२४– सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर यशस्वी वाटचाल करताना थोरात कारखान्याने देश पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. या उज्वल परंपरेसह ऊस उत्पादक व कामगारांचे हित जपताना या दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे कारखान्याच्या वतीने सर्व कामगारांना २०% बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याची माहिती चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी दिली असून सर्व कामगारांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात यावेळी व्यासपीठावर पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, कांचनताई थोरात, माधवराव कानवडे, उपाध्यक्ष संतोष हासे ,सर्व संचालक व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर हे होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, थोरात कारखान्याने तालुक्याचे हृदय म्हणून काम करतांना अत्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. काटकसरीतून हा कारखाना प्रगतीपथावर आहे. देशपातळीवरचे अनेक पुरस्कार या कारखान्याला मिळालेले आहेत. नवीन कारखान्याच्या उभारणीसह अनेक धोरणात्मक निर्णयामुळे इतरांसाठी मार्गदर्शक असणाऱ्या या कारखान्याने मागील हंगामांमध्ये दहा लाख मे. टना पेक्षा जास्त गाळप केले आहे. दीपावली निमित्त कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रोत्साहन पर २१५ रुपये प्रति मे. टन. अनुदान बँकेत जमा करण्यात आले आहे.यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना ३०१५ रू भाव मिळाला आहे. कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवड करण्याबरोबर एकरी जास्तीत जास्त उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे.
तर बाबा ओहोळ म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे कारखान्याने कामगारांचे हित जोपासताना त्यांचा विमा व विविध योजनांसह दरवर्षीप्रमाणे कर्मचाऱ्यांना २०% बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले आहे. यामुळे सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून थोरात कारखाना, दूध संघ व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या पेमेंट नंतर संगमनेरची बाजारपेठ फुलणार असल्याने सर्व व्यापारी बांधवांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
दीपावली निमित्त कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना २१५ रुपये प्रति मे. टन प्रमाणे पेमेंट बँकेत वर्ग केले आहे. तर कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान याचबरोबर अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे शेतकरी व कामगार यांना दीपावली निमित्त वाटप यामुळे जिल्ह्यात सर्वात मोठी असणारी संगमनेरची बाजारपेठ फुलणार असल्याने शहरातील व्यापारी व तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये ही आनंदाचे वातावरण आहे.



