आ.थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर तालुका वैभवशाली – दुर्गाताई तांबे
संगमनेर शहरातून संवाद रॅलीस उदंड प्रतिसाद
महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांच्या वतीने संगमनेर शहरांमध्ये विविध ठिकाणी संवाद रॅली काढण्यात आली. यावेळी शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाल्या.
यावेळी सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, ही निवडणूक संगमनेरसाठी ऐतिहासिक आहे. सतत केलेले काम,राज्यात होणारा नेतृत्वाचा आदर आणि महाविकास आघाडी मध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांचे महत्त्वाचे पद यामुळे संगमनेरकरांसाठी अभिमानाची ठरणारी ही निवडणूक आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी थेट पाईपलाईन योजना राबवून 24 तास मुबलक पाणी दिले. संगमनेर शहरांमध्ये विविध वैभवशाली इमारती निर्माण केल्या. नाशिक पुणे बायपास सह प्रवरा नदीवर विविध पूल बांधले. शैक्षणिक व सांस्कृतिक सुबत्ता असलेल्या संगमनेर शहराची वैभवशाली शहर म्हणून राज्यात ओळख निर्माण झाली आहे.
संगमनेरचा माणूस हा कष्टाळू आणि प्रामाणिक असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील प्रगती यामुळे हा तालुका महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरला आहे. हा लौकिक जपण्यासाठी व वाढवण्यासाठी आपल्या सर्वांना आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून राज्यातून सर्वाधिक मतांनी त्यांना निवडून देण्यासाठी काम करायचे आहे असे आवाहन केले.
शिवसेनेच्या वतीने अमर कतारी यांनी काढलेल्या रॅली प्रसंगी ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आमदार बाळासाहेब थोरात एक अत्यंत प्रामाणिकपणे खंबीर उभे राहिले एक सच्चा साथी म्हणून त्यांनी काम केले असल्याने संगमनेर तालुक्यातील तमाम शिवसैनिक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी उभा असून ही निवडणूक मताधिक्य देऊन राज्याची लक्ष वेधणारी ठरणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी शहरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने या रॅलींमध्ये सहभागी झाले याचबरोबर आमदार बाळासाहेब थोरात या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.