कोपरगाव विजय कापसे दि १ जानेवारी २०२५:तालुक्यातील वारी येथे ३१ डिसेंबर १८६६ रोजी स्थापना झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा १५८ वा वर्धापन दिन मंगळवार दि.३१ डिसेंबर रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेचे वारी हे नाव इंग्रजी भाषेत कावयातीमधून साकारले. सर्व शिक्षक, पालकांनी शाळेच्या परिसरात आकर्षक रांगोळी काढली होती. शाळेच्या प्रवेशद्वारापासून आलेल्या मान्यवर पालकांचा विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये लेझिम पथकासह स्वागत केले. संपूर्ण शाळेची आकर्षकपणे सजावट करण्यात आली होती. यावेळी खास महिला पालकांच्यासाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, सुईत दोरा ओवणे अश्या रंजक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. शाळेचे उपक्रम शिक्षक दत्तात्रय चव्हाण व इयत्ता चौथीतील शिवराज जाधव यांचाही वाढदिवस याच दिवशी असल्याने साजरा करण्यात आला. तालुकास्तरीय वैयक्तिक गीतगायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या इयत्ता दुसरीतील ईशा रामेश्वर जोशी हिचा सन्मान करण्यात आला. यावेळी दत्तात्रय चव्हाण व भागा जाधव या शिक्षकांच्यावतीने विद्यार्थ्यांना गोड शिरा व पोह्यांची मेजवानी देण्यात आली. यावेळी वारीच्या कृषी अधिकारी मनीषा पांगरेकर व करंजी-ओगदीच्या कृषी अधिकारी शुभांगी निकाडे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी असलेले पत्रकार रोहित टेके, कोपरगाव बाजार समितीचे संचालक प्रकाश गोर्डे, ऍड. शरद जोशी, अशोकराव बोर्डे, मुकुंद जोशी, डॉ. सर्जेराव टेके यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रतिभाताई टेके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोनाली महापुरे व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष दिपाली बनभेरू, अशोक मोहरे यांच्यासह एसएमसीचे सर्व सदस्य, महिला, पुरुष पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिन यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक चंद्रकांत माळी, शिक्षक सुधाकर अंबिलवादे, दत्तात्रय चव्हाण, भागा जाधव, गोरक्षनाथ साबळे, पांडुरंग खाडे, प्रवीण आहेर, गोविंदा पोरे, अरुण पवार तसेच शिक्षिका शर्मिला विधाटे, सुनीता डोखळे- टेके यांनी पालकांच्या सहभागातून विशेष परिश्रम घेतले.