कोपरगावच्या रेवतीच्या कवितांची विश्वविक्रमात नोंद;स्वरचित कवितांच्या वेबसाईटचे उद्घाटन संपन्न
कोपरगावच्या रेवतीच्या कवितांची विश्वविक्रमात नोंद;स्वरचित कवितांच्या वेबसाईटचे उद्घाटन संपन्न
कोपरगावच्या रेवतीच्या कवितांची विश्वविक्रमात नोंद;स्वरचित कवितांच्या वेबसाईटचे उद्घाटन संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि २० जानेवारी २०२५–ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने बालकवी स्पर्धेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘काव्यहोत्र’ या उपक्रमाने इतिहास रचला. १८ आणि १९ डिसेंबर रोजी राज्यभरातील बालकवींनी सलग २९ तास कवितांचे सादरीकरण करून ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये स्थान मिळवले. या उपक्रमात कोपरगाव येथील श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहावीतील बालकवी कुमारी रेवती गौरी संदीप चव्हाण हिने सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत कवी किशोर पाठक यांच्या निवासस्थानी ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन काव्यदिंडी या साहित्यिक व सांस्कृतिक परंपरांनी झाली. कुसुमाग्रज, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, आणि दिवंगत कवी आनंद जोर्वेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या साहित्यिक योगदानाला मानवंदना अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव गोपाळ पाटील यांच्या हस्ते झाले.‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स’ चे निरीक्षक अमी छेडा, अथर्व शुक्ल, कौशल घोडके, विश्वास ठाकूर आणि विनायक रानडे उपस्थित होते. सहभागी बालकवींच्या काव्यसंग्रहाची विशेष स्मरणिका यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. मराठी सिने अभिनेत्री ऋग्वेदी प्रधान, गुरुजी हॉस्पिटल नाशिकचे संस्थापक संचालक सी.ए. प्रकाश पाठक आणि ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव गोपाळ पाटील यांच्या हस्ते सहभागी सर्व बालकवींना सन्मानित करण्यात आले.
याच कार्यक्रमात रेवतीच्या स्वरचित ५१ कवितांच्या वेबसाईटचे डिजिटल उद्घाटन करण्यात आले. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे कौतुक केले आहे. रेवतीचा हा अभूतपूर्व प्रवास अनेक नवोदित बालकवींना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.रेवतीच्या कवितांचा आत्मा तिच्या बालसुलभ दृष्टीकोनात आहे. तिच्या रचनांमध्ये निसर्गाच्या सौंदर्याचे वर्णन, समाजातील समस्या, ऐतिहासिक कथेचे संदर्भ, आणि तत्त्वज्ञानाच्या सहज समजणाऱ्या अंगांचे दर्शन घडते.‘Revati’s Poetry World’ या विशेष वेबसाईटवर तिच्या ५१ हून अधिक कविता उपलब्ध आहेत. प्रत्येक कवितेच्या ओळींमधून तिच्या संवेदनशीलतेची झलक दिसते. रेवतीच्या कवितांमधून केवळ मनोरंजन नव्हे तर शिक्षण आणि प्रेरणादेखील मिळते. कार्यक्रमातील सादरीकरणा दरम्यान रेवतीच्या निसर्गाशी संवाद साधणाऱ्या कविता उपस्थित रसिकांना अंतर्मुख करणाऱ्या ठरल्या, तर आई-वडिलांच्या प्रेमाचा काव्यमय गौरव करणाऱ्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. तिच्या काव्य लेखनाचा आवाका आणि त्यामागची प्रगल्भता पाहून उपस्थितांनी तिचे भरभरून कौतुक केले.
रेवतीच्या या प्रवासाला शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आहे. तिच्या या वाटचालीस शाळेचे प्राचार्य के. एल.वाकचौरे,उप प्राचार्या शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे , पर्यवेक्षिका पल्लवी ससाणे, वर्गशिक्षिका तिला मार्गदर्शन करणारे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. रेवतीच्या काव्य प्रवासाला उत्तरोत्तर नवी उंची मिळेल याची खात्री आहे. तिच्या यशाबद्दल तिला मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.