पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण
लोणी विजय कापसे दि ८ ऑगस्ट २०२५– सुसंस्कृत राज्याची ओळख टिकवायची असेल तर, समाजाला साहित्याभिमुख आणि साहित्यीकांना ज्ञान सत्तेचा दरारा निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही. तत्वज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा योग्य मिलाफ करुन समाजाची मनं दुरुस्त करण्याची जबाबदारी ही साहित्यीकांना घ्यावी लागेल असे स्पष्ट मत अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ.मिलींद जोशी यांनी व्यक्त केले. भाषेच्या उच्चारांचे भान राज्यकर्त्यांनी राखण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंती दिना निमित्त देण्यात येणारा साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण डॉ.मिलींद जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.पुरस्काराचे यंदाचे हे ३५ वे वर्ष असून, या वर्षी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील जीवन गौरव पुरस्कार कोल्हापुर येथील जेष्ठ साहित्यीक डॉ.सुनिलकुमार लवटे यांना एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह देवून प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार डॉ.मिनाक्षी पाटील, डॉ.एच.व्ही देशपांडे यांना आणि नाट्यसेवा पुरस्कार दिलीप जगताप आणि कलागौरव पुरस्कार अंताबंर शिरढोनकर आणि प्रसाद अंतरवेलीकर यांना देवून गौरविण्यात आले. विशेष साहित्य पुरस्काराने एच.व्ही देशपांडे, अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्काराने संतोष भालेराव, जिल्हा विशेष साहित्य पुरस्काराने श्रीकांत कासट आणि प्रवरा परिसर विशेष साहित्य पुरस्काराने संदिप तपासे, वंसतराव ठोंबरे यांना देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, आ.काशिनाथ दाते, आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, वैभवराव पिचड, पांडुरंग अभंग,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, डॉ.राजेंद्र विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील, सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्यासह राज्यातून आणि जिल्ह्यातून कार्यकर्ते, साहित्यीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात डॉ.जोशी म्हणाले की, राजकारण्यांकडून सध्या व्यक्तिव्देशापोटी भाषेच्या उच्चाराचे भान राखले जात नाही. याचे कारण ज्ञानसत्तेचा दरारा कुठेतरी कमी होतोय का अशी खंत वाटते. कारण सध्या वैचारिक साहित्य निर्मिती ही थंडावली आहे. समाज जेव्हा वैचारिकते पासून दुर जातो तेव्हा समाज संयमी राहत नाही. त्यामुळे समाजाची मन दुरुस्त करण्याचे काम साहित्यीकांना पुढाकार घेवून करावे लागेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

साहित्यीकांनी सत्याचा शोध घेतला पाहीजे असे सुचित करुन, डॉ.जोशी यांनी सांगितले की, सत्याला कोणताही रंग आणि मध्यम मार्ग नसतो. सत्य हे नेहमीच समाजाला जागे करण्याचे काम करीत असते. साहित्यीकांनी विचारांचे झेंडे खाद्यांवर घेण्यापेक्षा सत्याचे झेंडे घेतले पाहीजे. साहित्यीकांवर कोणताही दबाव नसावा यासाठी एकला चलो रे ची भूमिका घेतली तरच, राजसत्ते समोर ज्ञानसत्तेचा दरारा निर्माण होवू शकेल. प्रतिभेचा आणि प्रतिमेचा सन्मान करायचा असेल तर, समाजाला साहित्याभिमुख व्हावे लागेल. कारण आज ग्रंथालये ओस पडली आणि मोबाईलने बरेच काही हिरावून घेतले आहे. प्रगल्भ समाजाची निर्मिती करायची असेल तर, विचारांची घुसळन होवू न देण्याचे प्रयत्न होण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली.

जेष्ठ साहित्यीक डॉ.सुनिलकुमार लवटे यांनी आपल्या भाषणात विखे पाटील परिवाराने राजसत्तेच्या सिंहासनावर असताना सुध्दा नम्रतेचा संस्कार जपला आहे. याचे कारण पद्मश्री आणि डॉ.बाळसाहेब विखे पाटील यांच्या पुण्याईचे काम पुढे जाण्याचे काम या घराण्याकडून सुरु आहे. मी कोल्हापुरचा असल्याने या भागातील सहकारी संस्थांची झालेली दुरावस्था मी जवळून पाहत आहे. पण या परिसरातील एकही सहकारी संस्थान खालसा झाले नाही. सहकार आणि साहित्य यांचे योग्य असे नाते या परिसराने जुळवून ठेवले आहे. अनेक साहित्य पुरस्कारांचे सोहळे राज्यात होतात परंतू येथे साहित्यीकांच्या सन्मानासाठी आख्ख गाव धावून येत हे या पुरस्काराचे वेगळेपण आहे.
माणसाची झोप उडविणारे साहित्य हे निर्माण झाले पाहीजे असे मत व्यक्त करुन, जगातील अनेक देश हे वैचारिक साहित्यामुळे घडले. स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरे करताना आपणही वैचारिक साहित्याच्या निर्मितीची कास धरली पाहीजे. स्व.यशवंतराव चव्हाण, तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महाराष्ट्राला वैचारिक संपन्नतेचा दिलेला वारसा टिकवायचा असेल तर, साहित्यीकांचा दर्जा कुठेही कमी होता कामा नये.
आपल्या स्वागतपर भाषणात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या पुरस्काराची संकल्पना सुरु झाली. ३५ वर्ष अखंडपणे ही परंपरा प्रवरा परिवाराने सुरु ठेवली आहे. सहकाराच्या पंढरीत मराठी सारस्वतांचा होणारा सन्मान हा मराठी साहित्य, कला आणि संस्कृतीची अभिरुची जोपासण्यास पाठबळ देणारा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के, तमाशा कलावंत अंतांबर शिरढोणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केली.
जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेले साहित्यीक डॉ.सुनिलकुमार लवटे यांनी आपल्या भाषणात आम्ही कोल्हापुरचे असल्यामुळे सुपारी घेण्याची सवय आहे. प्रवरेच्या काठी साहित्याचा एवढा सन्मान होत असेल तर, सहकाराच्या भूमित डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी साहित्य संमेलन आयोजित घेण्याची सुपारी स्विकारावी.



