पद्मश्रींच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; शेतकरी दिनाच्या घोषणेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉ. विखे पाटील यांच्याकडून आभार
पद्मश्रींच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; शेतकरी दिनाच्या घोषणेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉ. विखे पाटील यांच्याकडून आभार
पद्मश्रींच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; शेतकरी दिनाच्या घोषणेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉ. विखे पाटील यांच्याकडून आभार

अहिल्यानगर विजय कापसे दि ८ ऑगस्ट २०२५ सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी व ग्रामस्थ यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने या जयंतीला ‘शेतकरी दिन’ म्हणून घोषित केल्याबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले. “आज अनेक वर्षांनंतर पद्मश्रींच्या जयंतीला शोभेल असा कार्यक्रम नगर शहरात घेण्यात आला. सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पायावर उभा रहावा, हेच पद्मश्रींचं स्वप्न होतं. आज आलेला प्रत्येक ज्येष्ठ नागरिक त्या स्वप्नपूर्तीचा साक्षीदार आहे,” असे डॉ. सुजय विखे म्हणाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अकोलनेरचे सरपंच प्रतीक शेळके यांचे विशेष कौतुक करताना, “वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी ३०० ज्येष्ठ नागरिक व महिलांची नोंदणी करून त्यांना या कार्यक्रमासाठी एकत्र आणणं ही मोठी कामगिरी आहे. खरा नेता तोच, ज्याच्या पाठीशी अशा कार्यकर्त्यांचा मजबूत पाठिंबा असतो,” असे ते म्हणाले.

डॉ. विखे यांनी पुढे सांगितले की, केंद्र व राज्य सरकारच्या महायुती सरकारमधील योजना गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे करणारा प्रत्येक युवक भविष्यात मोठ्या पदावर पोहोचणारच आहे. “या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १२ हजार रुपयांचे साहित्य कोणतीही कोणाला टक्केवारी न देता मिळत आहे. फक्त मोदीजी, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि विखे पाटील परिवारावर विश्वास ठेवल्याने आज ही मदत शक्य झाली,” असे ते म्हणाले.

यावेळी डॉ. सुजय विखे पाटील ‘सिस्पे’ प्रकरणाचा उल्लेख करताना म्हटले की, सिस्पे या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीचे उद्घाटन लोकप्रतिनिधीच्या हस्ते संपन्न झाले होते, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना गाड्यांचे वाटप देखील करण्यात आले होते. परिणामतः, या कंपनीने गोरगरिब शेतकऱ्यांकडून हजारो कोटी रुपये उकळवले आणि फरार झाली. हा प्रकार म्हणजे दिवसाढवळ्या टाकलेला दरोडाच असून, याची संपूर्ण जबाबदारी उद्घाटन करणाऱ्या लोकप्रतिनिधीने घ्यावी. ते पुढे म्हणाले, “आपला लोकप्रतिनिधी जर अशा फसव्या कंपन्यांचे उद्घाटन करत असेल, तर जनतेला त्यावर विश्वास बसणारच. जनता कर्ज काढून पैसे गुंतवणार हे अपेक्षितच आहे. त्यामुळे अशा प्रकारात उद्घाटन करणाऱ्या त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी ठरतेच.” यासोबतच जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प आणि विकासकामांचा अभाव या मुद्द्यांवर देखील त्यांनी सवाल उपस्थित केले. “मी खासदार असताना वेळेआधी प्रकल्प पूर्ण केले, मात्र गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात एकही महत्त्वाचा केंद्र सरकारचा प्रकल्प आला नाही,” असे ते म्हणाले.
तसेच, तब्बल ११०० कोटी रुपयांचा साकळाई प्रकल्प पुढील एका महिन्यात भूमिपूजन होणार आहे असल्याची माहिती त्यांनी दिली. सौरवरून घेतलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष पुढाकारातून साकार होत असून, आमदार शिवाजीराव कर्डिले आणि पाचपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने पूर्णत्वास जात आहे. या योजनेमुळे नगरच्या ग्रामीण भागातील जिरायती शेतकऱ्यांना पाणीपुरवठ्याचा मोठा लाभ होणार आहे. एकंदर पाहता, डॉ. सुजय विखे यांनी दिलेला शब्द त्यांनी पाळत शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेली ही कृती मोलाची ठरत आहे.
दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात देखील त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, या बाबतीत सध्या काही जण श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ही काही श्रेयवादाची लढाई नाही. काम खरोखर मार्गी कुणी लावले आहे, हे आधी पाहणे गरजेचे आहे. ज्यांना श्रेय घ्यायचे आहे त्यांनी घ्यावे, पण ते घेताना आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे आभार मानावे, त्यांचे आभार प्रदर्शन करणारे फोटो लावावेत. त्यानंतर त्यांनी कितीही बॅनरबाजी केली, तरी आम्हाला काही हरकत नाही. कारण या कामाचे खरे आणि एकमेव श्रेय जर कुणाला जाते, तर ते फक्त नरेंद्रजी मोदी यांनाच जाते.
भाजपा शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की, डॉ. सुजय विखे पाटील हे असे लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांनी पराभव विसरून नेहमीच ज्येष्ठ नागरिकांची सेवा आणि विकासकामांमध्ये पूर्ण योगदान दिले आहे. डॉ. संजय विखे पाटील यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांनी कुठलाही विचार न करता दुसऱ्याच दिवशी कामाला सुरुवात केली आणि माजी खासदार असल्याची भावना कधीही आम्हाला जाणवू दिली नाही. विकासकामे आणि समाजसेवा यांच्या माध्यमातून सतत लोकांमध्ये राहून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आगामी काळात विखे परिवार, विखे फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी नेहमी आपल्या सोबत खंबीरपणे उभी राहील असे मत मांडून पुन्हा एकदा स्वर्गीय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याला आणि प्रेरणेला वंदन केले.




