जयहिंद आदिवासी आश्रम शाळेमुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठी संधी – बाळासाहेब थोरात
वस्तीगृह व ट्रेनिंग सेंटर मुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मोठी संधी
कोळवाडे येथे नवीन आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह व ट्रेनिंग सेंटर इमारतीची भूमिपूजन

संगमनेर विजय कापसे दि ३ ऑक्टोबर २०२५–आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरता थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी कोळवाडे येथे आश्रम शाळा सुरू केली. आश्रम शाळा राज्यातील इतर आश्रम शाळांसाठी मॉडेल ठरली असून जयहिंद आदिवासी आश्रम शाळेतील अनेक विद्यार्थी आज देशात आणि विदेशात चांगल्या पदावर काम करत असल्याने या विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळाली आहे. याचबरोबर नव्याने होत असलेल्या वस्तीगृह आणि ट्रेनिंग सेंटर मुळे स्थानिक विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळेल असा विश्वास माजी शिक्षण मंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

कोळवाडे येथे जय हिंद आदिवासी आश्रम शाळेचा वर्धापन दिन राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व फादर रॉबर्ट यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर सुधाकर जोशी, गणपतराव सांगळे, विष्णुपंत रहाटळ, काशिनाथ गोंदे ,मुख्याध्यापक दशरथ वर्पे, केके थोरात, शरद नाना थोरात आदिसह स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवीन वस्तीगृह व ट्रेनिंग सेंटर इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना मा शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. आदिवासी व गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा व्हावी याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कोळवाडे येथे आदिवासी आश्रम शाळा सुरू केली. या आश्रम शाळेतील 610 विद्यार्थी राज्यभरात विविध मोठ्या पदांवर कार्यरत असून हे संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. आदिवासी व गरीब समाजातील पालकांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे अत्यंत चांगल्या सुविधा या शाळेमध्ये असून नव्याने होत असलेल्या ट्रेनिंग सेंटर मधून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण प्रणाली मिळणार आहे याचबरोबर दर्जेदार असे वस्तीगृह याठिकाणी होणार असल्याने विद्यार्थ्यांची राहण्याची मोठी सोय होणार आहे.

तर माजी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जय हिंद आदिवासी आश्रम शाळा ही राज्यातील आश्रम शाळांसाठी मॉडेल ठरली आहे. गुणवत्ता हे या शाळेचे वैशिष्ट्य असून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी यापुढेही शाळा प्रयत्न करेल असे ते म्हणाले तर फादर रॉबर्ट म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा ग्रामीण विकासाचा मंत्र घेऊन आदिवासी बांधवांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आपण काम करत आहोत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी केले यावेळी शालेय समितीचे सदस्य ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




