डॉ घायतडकर यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर
डॉ घायतडकर यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर

कोपरगाव विजय कापसे दि ११ जुन २०२५– कोपरगाव येथील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ.कुणाल अशोकराव घायतडकर यांना नुकताच स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५ सरपंच सेवा संघाचे सर्वेसर्वा बाबासाहेब पावसे यांनी निवड पत्र देत जाहीर केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा या म्हणीप्रमाणे स्वराज्य सरपंच सेवा संघ गेल्या अनेक वर्षापासून समाजात उल्लेखनीय कार्य करत असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव करत असते त्यातून नक्कीच त्यांना त्यांच्या कामाची पोहच पावती मिळत असते. असेच कोपरगाव शहरातील जनसेवा हीच ईश्वर सेवा मानत परिसरातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे सामाजिक तसेच आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले निस्वार्थी आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित असलेले डॉ.घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ कुणाल अशोकराव घायतडकर हे करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

डॉ कुणाल घायतडकर हे त्यांची पत्नी डॉ भाग्यश्री घायतडकर यांना सोबत घेत आपल्या डॉ घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटल तसेच अशोकराव घायतडकर पाटील सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात दरवर्षी २६ जानेवारी ते छत्रपती शिवाजी महाराज जयंती पर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या मशिनरीचा वापर करत मोफत दंतरोग तपासणी करत असतात त्यांचावर अल्प दरात उपचार देखील करत असतात. वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत ते वेगवेगळे प्रकारचे महाआरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर आयोजित करत अनेक गरुजू रुग्णांची सेवा करत असतात. शिर्डी पंढरपूर जाणाऱ्या वेगवेगळ्या पालखी दिंड्यांचा देखील ते पाऊणचार करत असतात.

गेल्या वर्षी तर ते राहत असलेल्या शारदानगर परिसरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केलेल्या नवरात्रोत्सव अतिशय देखणा होता असे एक ना अनेक सामाजिक कार्यात हिरारीने सहभागी होत ते कार्य तडीस नेणारा एक युवा डॉक्टर म्हणून सर्व परिचित असलेले डॉ कुणाल घायतडकर यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून सदर पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक १५ जुन रोजी अहिल्यानगर येथे विविध मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे.




