जनतेने स्वीकारलेले लोकमान्य नेतृत्व बाळासाहेब थोरात

जनतेने स्वीकारलेले लोकमान्य नेतृत्व बाळासाहेब थोरात
जनतेने स्वीकारलेले लोकमान्य नेतृत्व बाळासाहेब थोरात
संगमनेर विजय कापसे दि ७ फेब्रुवारी २०२६–कदाचित आजच्या तरुण पिढीला पूर्वीचे संगमनेर आठवत नसेल. मात्र आज दिसतो तसा हा तालुका पूर्वी विकसित नव्हता. दुष्काळी भाग असल्याने शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत होते, औद्योगिक विकास नव्हता, कामासाठी तालुक्याबाहेर शहरात जावं लागायचं. पाठोपाठ रोजीरोटीची, मुलाबाळांच्या शिक्षणाची, आरोग्याची आणि शेतीचीही चिंता सर्वांना भेडसावत असे!

अशा अवस्थेतील संगमनेरला घडविण्याचा निर्धार तत्कालीन युवक बाळासाहेब थोरात यांनी केला आणि संगमनेरचा सर्वांगीण विकास आपल्या आयुष्याचं ध्येय बनवून त्याच्या पूर्तीसाठी ते आजपर्यंत अविरत झटले. या त्यांच्या संघर्षाचे सर्व संगमनेरकर विशेषतः ज्येष्ठ लोक साक्षीदार राहिले आहेत. हा प्रवास सोपा नव्हता मात्र त्यांनी सर्वांना सोबत घेऊन सकारात्मक राजकारणाचा अवलंब करून आज जो विकास दिसतो तो घडविण्यात त्यांना यश आले. हे करताना त्यांनी जनसामान्यांच्या अडीअडचणी जाणून, त्यांच्याशी हितगुज करत प्रश्न सोडवण्यावर भर दिला. आपल्या मनमिळावू सहज स्वभावाने त्यांनी लोकांच्या मनात घर केले. लोक त्यांना आपल्या घरचा सदस्यच, कुटुंबप्रमुख मानून त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येतात. आणि साहेबदेखील त्यांना कधी नाराज करत नाही. त्यामुळेच आज संगमनेरकरांचं आणि साहेबांचं एक आगळंवेगळं जिव्हाळाचं नातं निर्माण झालं आहे. कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी सर्वांच्या हृदयात आदराचे स्थान मिळविले.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी नीतिमत्तेला धरून राजकारण केलं, त्यांनी कधीच तात्कालिक सत्तेसाठी निष्ठा सोडली नाही, त्यांनी कधीच जनतेवर निर्णय लादले नाही, कधीच विरोधकांचा बंदोबस्त केला नाही, व्यापाऱ्यांना वेठीस धरले नाही, कायम जनतेच्या सोबत जनतेच्या हिताच्या भूमिका त्यांनी घेतल्या. कोणाचे काम अडवून धरले नाही, कोणाच्या व्यापार उद्योगाला त्रास दिला नाही. सर्वांना सोबत घेऊन अत्यंत सकारात्मक राजकारण करण्यावर त्यांचा भर राहिला. त्यामुळेच तालुक्यातील सहकार चळवळ आज राज्याला दिशा दाखवते आहे. सहकार कसा चालवायचा, तर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासारखा, हे राज्यात आज अभिमानाने सांगितले जाते. राज्यातल्या अनेक मान्यवर संस्थांचे पदाधिकारी, अनेक मान्यवर मंडळी संगमनेरमध्ये येऊन सहकाराचा अभ्यास करतात. हे साहेबांच्या नेतृत्वाचं यश आहे.

सर्वात प्रथम संगमनेरचा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना आपला भाव नक्की करतो, भूमिका घेतो आणि त्यानंतर राज्यातले अन्य सहकारी साखर कारखाने आपले भाव जाहीर करायला सुरुवात करतात, आपल्या भूमिका घेतात! प्रत्येक वर्षी राज्य स्तरावरचा आणि राष्ट्रीय स्तरावरचा गुणवत्तेच्या बाबतीतील एक तरी पुरस्कार या थोरात कारखान्याला मिळतोच, हे देखील याच नेतृत्वाचं यश आहे. शेतकरी आणि दूध संस्था या दोघांच्याही हिताचा आणि विकासाचा विचार करणारा संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ राज्यात आदर्श ठरला आहे, राजहंस उत्पादन म्हणजे गुणवत्तेची हमी, हे आहे साहेबांचे नेतृत्व, राज्यातले सर्व शेतकी सहकारी संघ एकतर बंद पडलेत किंवा मोडकळीस आले आहेत, अशा वेळी संगमनेर तालुका शेतकी सहकारी संघ आदर्शरीत्या सुरु आहे, हे आहे इथल्या मातीतल्या नेतृत्वाचे यश आहे. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

संगमनेर तालुक्यातील सर्व शासकीय इमारती बघा, प्रत्येक इमारत सुसज्ज, नीटनेटकी व देखणी, यामागे आहेत साहेबांचे परिश्रम! आर्थिक मंदीने सगळे मेटाकुटीला आले अशा वेळी संगमनेरचा व्यापार जोमाने उभा आहे, प्रत्येक वर्षी दिवाळीत संगमनेरच्या बाजारपेठेत 150 कोटी रूपयांच्या वर उलाढाल होते, हे आहे या मातीला मिळालेल्या सक्षम नेतृत्वाचे यश! छोट्या-मोठ्या मिळून संगमनेरमध्ये शेकडोहून अधिक पतसंस्था कार्यरत आहे आणि त्या सर्वांमध्ये मिळून हजारो कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, संगमनेर करांचा विश्वासाला पात्र ठरलेले हे आहे साहेबांच्या आदर्श व्यवस्थापनाचे यश.

१९८५ सालापासून आमदार ते विविध मंत्रिपदांची जबाबदारी या आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत साहेबांनी केलेल्या विकास कामांचा पसारा भव्यदिव्य आणि डोंगराएवढा आहे. तालुक्यातील अनेक कामे त्यांच्या सक्षम नेतृत्वाची साक्ष देतात. सहज म्हणून आजूबाजूच्या तालुक्यांवर एक नजर मारा, संगमनेरची आणि त्या तालुक्यांची तुलना करा! जनजीवन बघा, तिथली माणसं बघा, शेतीवाडी बघा, व्यापार समजून घ्या, सामाजिक समरसता बघा. यातून नक्कीच आपल्या आजच्या समृद्ध आणि विकसित संगमनेरच्या विकासाची पाने उलगडत जातील. हा बदल सहज आणि एका दिवसात घडलेल्या नाही यामागे आहेत साहेबांचे निरंतर श्रम आणि नेतृत्व आणि सोबतीला संगमनेरकरांचा विश्वास.

मात्र दुर्दैवाने मागील विधानसभा निवडणुकीत लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा अनैसर्गिक पराभव झाला. हा पराभव सर्वच राज्यासाठी चिंतेचा विषय ठरला. लाखोंच्या मताधिक्याने निवडून येणारे बाळासाहेब थोरात संगमनेर मधून पराभूत हे वृत्त सर्वांना विश्वास न पटण्यासारखे होते. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने संपूर्ण तालुका हळहळला. अतिशय खालच्या पातळीचे जातीपातीचे आणि धार्मिक राजकारण झाले. पण बाळासाहेब थोरात यांनी या पराभवालाही धीरोदात्तपने तोंड दिले. कार्यकर्त्यांची समजूत काढली. सर्वांना पुन्हा जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. एवढेच नाही तर ते दुसऱ्या दिवसापासूनच पुन्हा जनतेत सामील झाले. मागील 40 वर्ष सुरू असणारी सामाजिक कामांची घोडदौड थांबू नये, तालुक्याचा विकास खुंटू नये हीच या मागची त्यांची भावना होती. जनतेने दिलेला निर्णय त्यांनी मान्य केला पण आपली कामाची जबाबदारी सोडली नाही. ते जनतेला दोष देत बसले नाही. काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करू असे त्यांनी जनतेला आश्वासन दिले. खरोखरच लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासारखा प्रगल्भ आणि संयमी नेता दुसरा कोणी नाही.
पराभवानंतर त्यांनी कार्यकर्ते व जनतेशी संवाद साधण्यासाठी सभेचे आयोजन केले. या सभेला तरुण व कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली. लोकनेतेचा झालेला पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागला. या सभेत काहींना अश्रू अनावर झाली. तर काहींनी साहेबांचा हातच सोडला नाही. थोरात साहेबांचा पराभव कार्यकर्त्यांसह तालुक्याला चटका लावणारा ठरला. खरोखरच एखाद्या राजकीय नेत्याप्रती जनतेची अशी भावना म्हणजे त्या नेत्यांनी केलेल्या कामाची पोच पावतीच आहे असेच म्हणावे लागेल. साहेब तुम्ही सत्तेत असो वा नसो मात्र आमच्यासाठी कायमच आधारस्तंभ आहात आणि राहणार यात शंका नाही.
राजकारणात कधीही कोणी संपत नसतो. उलट राजकारण ही सतत व अविरत चालणारी बाब आहे. विधानसभा निवडणुकीनंतरच काही कालावधीत अनेक वर्ष प्रलंबित असणारी संगमनेर नगरपालिकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत थोरात साहेबांनी कार्यकर्त्यांना अचूक मार्गदर्शन केले. लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीला अभुतपूर्ण यश मिळाले. संपूर्ण राज्यात सर्वाधिक मताधिक्याने सौ. मैथिली तांबे यांची नगराध्यक्षपदी नियुक्ती झाली. जनतेने या निवडणुकीत पुन्हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर विश्वास दाखवला व त्यांना संधी दिली. आगामी काळातही पुन्हा तालुका थोरात साहेब यांच्या पाठीशी भक्कम उभा राहील यात शंका नाही. चुका झाल्या असतील त्या आता जनतेने दुरुस्त केल्या आहे. संगमनेरचा बालेकिल्ला बाळासाहेब थोरात यांचाच होता आणि यांचाच राहणार हेच सत्य आणि वास्तव आहे.
आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
आपलाच
विशाल काळे
(सोशल मिडिया समन्वयक, बाळासाहेब थोरात साहेब)



