संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार!
संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार!
“दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका” — दिलीपशेठ पुंड
Sangamner vijay kapse दि. २७ ऑगस्ट २०२६ : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हा केवळ विकास प्रकल्प नसून प्रत्येक संगमनेरकराच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. त्यामुळे संगमनेरकरांच्या अपेक्षांना पूर्णपणे न्याय देणारे भव्य-दिव्य आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे स्मारकच उभारण्यात येईल. स्मारकाच्या उभारणीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका माजी नगराध्यक्ष दिलीपशेठ पुंड यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना दिलेला स्वाभिमान, लोककल्याणकारी राज्यकारभार, दूरदृष्टी आणि रयतेप्रती असलेली बांधिलकी आजही प्रेरणादायी आहे. त्यामुळे संगमनेरमधील स्मारक केवळ पुतळ्यापुरते मर्यादित न राहता महाराजांचे विचार व कर्तृत्व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारे प्रेरणास्थळ असावे, अशी संगमनेरकरांची भावना आहे. त्यानुसार नगरपालिकेकडून नियोजन करण्यात येत आहे.
स्मारकासाठी आवश्यक वाढीव जागेचा प्रश्न गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र या काळात परिवहन तसेच नगरविकास खाते संबंधितांकडे असतानाही हा प्रश्न शासनस्तरावर का सोडवण्यात आला नाही, असा सवाल पुंड यांनी उपस्थित केला. पुरेसा कालावधी आणि संधी उपलब्ध असतानाही वाढीव जागेचा प्रश्न प्रलंबित राहिला, याचे उत्तर संगमनेरकरांना मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले.

गेल्या दीड वर्षांत वाढीव जागेचा प्रश्न मार्गी लागला नाही आणि आता नगरपालिका स्मारकाचे प्रत्यक्ष काम पुढे नेण्याच्या तयारीत असताना त्यावर आक्षेप घेणे हा विरोधाभास आहे. कामाला गती देण्याऐवजी नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करणे योग्य नाही. स्मारक अधिक भव्य आणि सुंदर कसे होईल, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य करावे, असे आवाहन पुंड यांनी केले.
आमदार सत्यजीत तांबे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी यापूर्वी स्पष्ट भूमिका घेत सातत्याने पाठपुरावा केला आहे. संगमनेरकरांच्या भावनांना न्याय देणारे आणि शहराच्या वैभवात भर घालणारे स्मारक उभारले जावे, यासाठी प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे आता या विषयाला राजकीय वादाचे स्वरूप न देता प्रत्यक्ष कामाला गती देणे महत्त्वाचे असल्याचे पुंड यांनी सांगितले.

स्मारकाचे नियोजन करताना भविष्यातील शहराचा विस्तार, प्रशस्त परिसर, सुशोभीकरण, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि पर्यटकांच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा विचार केला जाणार आहे. वाढीव जागा अधिकृतपणे उपलब्ध झाल्यास तिचा उपयोग स्मारक अधिक भव्य करण्यासाठी आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी केला जाईल. संबंधितांकडे अधिकार आणि खाती असतील तर त्यांनी वाढीव जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. मात्र त्या मुद्द्यामुळे सुरू असलेल्या स्मारकाच्या प्रक्रियेला खीळ बसता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करण्याऐवजी त्यांच्या स्मारकासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. दीड वर्षे संधी आणि संबंधित खाती हातात असतानाही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला गेला नाही. आता नगरपालिका प्रत्यक्ष कामाला लागल्यानंतर त्याच मुद्द्यावरून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर संगमनेरकर ते स्वीकारणार नाहीत. कोण स्मारकाचे काम पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि कोण अडथळे निर्माण करीत आहे, हे जनतेला चांगले समजते,” असे पुंड म्हणाले.
जाहिरात
संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ओळखीचा आणि अभिमानाचा भाग म्हणून हे स्मारक विकसित करण्याचा मानस आहे. भविष्यात संगमनेरमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाराजांच्या कर्तृत्वाची जाणीव व्हावी आणि प्रत्येक संगमनेरकराला स्मारकाकडे पाहताना अभिमान वाटावा, अशा पद्धतीने त्याची उभारणी केली जाईल.
“छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा पक्षाचा विषय नसून संपूर्ण संगमनेरचा विषय आहे. त्यामुळे राजकारण न आणता संगमनेरकरांच्या अपेक्षेप्रमाणे सर्वांनी मिळून भव्य-दिव्य स्मारक उभारण्यासाठी योगदान द्यावे. नगरपालिका या कामात कोणतीही कमतरता ठेवणार नाही. वाढीव जागा उपलब्ध झाली तर तिचाही योग्य वापर केला जाईल आणि संगमनेरकरांच्या मनातील स्मारक प्रत्यक्षात साकारले जाईल,” असा विश्वास दिलीपशेठ पुंड यांनी व्यक्त केला.




