औद्योगिक गुंतवणुकीसाठी प्रवरा बँकेने सज्ज राहावे : ना. राधाकृष्ण विखे पाटील

औद्योगिक गुंतवणुकीसाठी प्रवरा बँकेने सज्ज राहावे : ना. राधाकृष्ण विखे पाटील
शून्य टक्के एनपीएची सलग तिसऱ्या वर्षी कामगिरी; सभासदांना १० टक्के लाभांशाची घोषणा
Ahilyanagar vijay kapse दि १३ सप्टेंबर २०२६ : अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र म्हणून पुढे येत असून, जिल्ह्यात होणारी मोठी गुंतवणूक लक्षात घेता नव्याने येणाऱ्या उद्योगांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी प्रवरा सहकारी बँकेने सज्ज राहावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

प्रवरा सहकारी बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, ट्रक वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर राठी, प्रवरा फळे-भाजीपाला सोसायटीचे चेअरमन मकरंद गुणे, व्हाईस चेअरमन मच्छिंद्र थेटे, सोपानराव शिरसाठ, विजयराव लगड, शांतीनाथ आहेर, सहकारी संस्थांचे सहनिबंधक नामदेव ठोंबळ, बँकेचे मॅनेजर सौरभ बालोटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा आता औद्योगिक विकासाचे मुख्य केंद्र बनत आहे. शिर्डीसह हरेगाव, बेलवंडी, अहिल्यानगर आणि राहुरी येथे औद्योगिक वसाहतींसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्योजक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास तयार असून, या उद्योगांशी बँकेने कसे जोडून घेता येईल, याचा विचार प्रवरा सहकारी बँकेने करावा.
उद्योजक आणि बँक यांच्यातील मजबूत नात्यामुळे जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. नव्या उद्योगांना आवश्यक आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्याची भूमिका बँकेने स्वीकारल्यास जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात बँकेचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

मागील आर्थिक वर्षात बँकेने केलेल्या प्रगतीबद्दल ना. विखे पाटील यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. केवळ ५ हजार रुपयांच्या ठेवींवरून सुरू झालेला बँकेचा प्रवास आता १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींपर्यंत पोहोचला आहे. ठेवीदार आणि कर्जदारांचा बँकेवरील असलेला विश्वास याचे हे प्रतीक आहे. सुमारे १ हजार ८०० कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण करण्याचा टप्पा नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी भूषणावह असल्याचे त्यांनी नमूद केले.
छोटे व्यावसायिक, उद्योजक आणि कर्जदार यांच्या गरजेनुसार कर्जपुरवठा करण्याचे काम बँकेच्या माध्यमातून होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
सहकारी बँकांचा प्रवास आता नागरी बँकांकडून शेड्युल्ड बँकिंग व्यवस्थेकडे होत आहे. त्यामुळे बँकांना अनेक मूलभूत बदलांना सामोरे जावे लागत आहे. प्राथमिक सोसायट्यांसह सहकारी बँकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने घेतलेले धोरण निश्चितच पाठबळ देणारे आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या दूरदृष्टीमुळे सहकारी बँकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जाणे सुलभ झाले आहे.
डिजिटल बँकिंग सुविधांमुळे ग्राहकांना अधिक सुलभ सेवा उपलब्ध होत असून, त्याचा उपयोग व्यवसायवृद्धीसाठीही होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या माध्यमातून होणारे आर्थिक घोटाळे ही चिंताजनक बाब असल्याचे सांगून ना. विखे पाटील म्हणाले की, अशा परिस्थितीतही प्रवरा सहकारी बँकेने पारदर्शक आणि सक्षम कारभाराच्या माध्यमातून सलग तिसऱ्या वर्षी शून्य टक्के एनपीए राखण्यात यश मिळविले आहे. ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभासदांना १० टक्के लाभांश
ठेवीदार आणि कर्जदारांचा भक्कम विश्वास तसेच संचालक मंडळाच्या सक्षम कारभारामुळे बँकेची प्रगती चांगल्या पद्धतीने होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदा सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात केली.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील तसेच बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे यांनी मनोगत व्यक्त करून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. सभेतील विषयपत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.



