पालकमंत्री डॉ. विखे-पाटील यांची ‘वहीतुला’ करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पालकमंत्री डॉ. विखे-पाटील यांची ‘वहीतुला’ करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
पालकमंत्री डॉ. विखे-पाटील यांची ‘वहीतुला’ करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Loni vijay kapse दि. १२ जुन २०२६– जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील प्राध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन वह्यांची भेट दिली. मंत्री विखे-पाटील यांची ‘वहीतुला’ करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुके, हार आणि इतर भेटवस्तू यांवर होणारा अनावश्यक खर्च टाळून या निधीचा विनियोग गरजू विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक साहित्यासाठी करावा, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कार्यकर्ते, संस्था आणि ना. विखे-पाटील यांच्या हितचिंतकांनी या अनोख्या पद्धतीच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला असून, गरजू विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य संकलित झाले आहे.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील प्राध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही गरजू विद्यार्थ्यांकरिता वह्या भेट देऊन या उपक्रमामध्ये योगदान दिले आणि मंत्री विखे-पाटील यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. मंत्री विखे-पाटील यांची वहीतुला करण्यात आली. अतिशय साध्या पद्धतीने शुभेच्छांच्या झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे-पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे-पाटील, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती अण्णासाहेब कडू, संचालक राहुल धावणे, मीनाक्षी निर्मळ, संचालक किशोर नावंदर, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, सौ.लीलावती सरोदे, डॉ. महेश खर्डे यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याची भूमिका मंत्री विखे-पाटील यांनी मांडली आहे. वाढदिवसाचा कोणताही डामडौल न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे. यंदाच्या वर्षीही वाढदिवसाच्या दिवशी कोणताही कार्यक्रम न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, शुभेच्छांसाठी केल्या जाणाऱ्या खर्चाचा विनियोग गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. या आवाहनाला जिल्ह्यासह बाहेरून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला असून, मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य संकलित होऊ लागले आहे.

“वाढदिवसाच्या दिवशी मी लोणीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी कोणीही येऊ नये, अशी विनंती ना. विखे-पाटील यांनी कार्यकर्ते आणि हितचिंतकांना केली असून आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असल्यामुळेच कार्य करण्यासाठी सातत्याने मला ऊर्जा मिळते. वाढदिवसाचा कोणताही कार्यक्रम न करता यंदाच्या वर्षी गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमात योगदान देण्याचे आवाहन मंत्री विखे-पाटील यांनी केले आहे.”



