अधिकारी निष्क्रीय झाले की लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो; प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करा

अधिकारी निष्क्रीय झाले की लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो; प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करा
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश; पारनेरमध्ये टंचाई आढावा बैठक
Parner vijay kapse दि ९ ऑगस्ट २०२६: अधिकारी निष्क्रीय होतात, तेव्हा लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो. त्यामुळे नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याच्या भूमिकेतून अधिकाऱ्यांनी काम करावे, असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

पारनेर तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत ना. विखे पाटील यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार काशिनाथ दाते, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे, अशोक सावंत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत तालुक्यातील पाणी, वीज, रस्ते तसेच औद्योगिक वसाहतीशी संबंधित प्रश्न नागरिकांनी मांडले. या प्रश्नांची दखल घेत ना. विखे पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

औद्योगिक वसाहतीमधून तलावात सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त पाण्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवावा, असे निर्देश त्यांनी दिले.
जामगाव येथे टँकरची मागणी करूनही निर्णय घेतला जात नसल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली. यावर गटविकास अधिकारी सोनकुसळे यांनी चुकीची माहिती दिल्याबद्दल ना. विखे पाटील यांनी त्यांना कडक शब्दांत ताकीद दिली. तसेच जामगाव येथे तातडीने टँकर सुरू करण्याचे निर्देश दिले.

पारनेर शहरातील रस्त्यांची कामे दुभाजक टाकूनच पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश देतानाच पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे तातडीने बुजवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी केली.
तालुक्यातील सहा उपसा सिंचन योजनांना जलसंपदा विभागाने मंजुरी दिली असून, त्यापैकी तीन योजनांना मुळा धरणातून पाणी उपलब्ध होत आहे. उर्वरित तीन योजनांसाठी पाण्याची उपलब्धता करून देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यास मोठी मदत होणार असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.
पिंपळगाव जोगा धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, चार्याच्या दुरुस्तीसाठी १०१ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहितीही ना. विखे पाटील यांनी दिली.
यापूर्वी तालुक्यात केवळ खंडणीचे राजकारण होते. विकासाच्या योजना कागदावरच राहिल्या आणि केवळ बिले काढण्याचे काम झाले. मात्र, आता तालुक्याची परिस्थिती पूर्णपणे बदलत आहे. गुंडगिरी हद्दपार होऊन विकासाची कामे होत आहेत. आमदार काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून तालुक्यात आणखी मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार असून, निधी कमी पडू दिला जाणार नाही. नागरिकांनी व्यक्त केलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही ना. विखे पाटील यांनी दिली.
आमदार काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात अधिकाऱ्यांनी काम करताना गांभीर्य दाखवावे, नागरिकांना कामांसाठी वारंवार चकरा मारायला लावू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच वीज भारनियमनाचा प्रश्न मांडून ही समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.




