तिरंगा रॅलीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी गावागावात नियोजन करावे- : ना. राधाकृष्ण विखे पाटील

तिरंगा रॅलीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी गावागावात नियोजन करावे- : ना. राधाकृष्ण विखे पाटील
१२ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरात भव्य महारॅली; अहिल्यानगरमधून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार

Loni vijay kapse दि ८ ऑगस्ट २०२६-भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार आहेत. तिरंगा रॅलीच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पक्षाच्या बूथवरील प्रत्येक कार्यकर्त्याने नियोजन करावे. प्रत्येक मंडलामध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवून नागरिकांना या अभियानात सहभागी करून घेण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित दुरदृष्य प्रणालीव्दारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातून या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपाध्यक्ष अशोक पवार, भाजयुमोचे रोहित चौधरी, अल्पसंख्याक आघाडीचे रऊफ शेख यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष आणि विविध आघाड्यांचे प्रमुख उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असताना ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला जागतिक स्तरावर मान मिळवून दिला आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ही यात्रा अखंडपणे सुरू आहे. सक्षम, समृद्ध, सुरक्षित आणि श्रेष्ठ भारताचे स्वप्न आता पूर्ण होत असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.

‘हर घर तिरंगा’ अभियान भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर साजरे होणार आहे. या अभियानामुळे देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान अधिक वृद्धिंगत होणार असून, देशभक्तीची प्रचंड ऊर्जा या अभियानातून मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आपल्या गावात आणि बूथवर ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वीपणे राबवावे. १२ ऑगस्टच्या महारॅलीपूर्वी प्रत्येक मंडलामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि सीताराम भांगरे यांचीही भाषणे झाली.



