एन.एस.एस.मधून व्यक्तिमत्त्व विकास व चारित्र्यसंवर्धन राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटनप्रसंगी प्रा. गणेश निमसे यांचे प्रतिपादन

एन.एस.एस.मधून व्यक्तिमत्त्व विकास व चारित्र्यसंवर्धन
राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटनप्रसंगी प्रा. गणेश निमसे यांचे प्रतिपादन
एन.एस.एस.मधून व्यक्तिमत्त्व विकास व चारित्र्यसंवर्धन
राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटनप्रसंगी प्रा. गणेश निमसे यांचे प्रतिपादन

Kopargaon vijay kapse दि ८ सप्टेंबर २०२६ : समाजसेवेतून व्यक्तिमत्त्व विकास आणि चारित्र्यसंवर्धन होत असते. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) ही केवळ उपक्रमांपुरती मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी ती जीवनाचा अविभाज्य भाग बनवावी. खरी संस्कृती व वारसा समजून घेण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन पर्यावरण, जैवविविधता आणि जलस्रोतांविषयी जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक तथा न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथील तत्त्वज्ञान विभागाचे सहायक प्राध्यापक गणेश निमसे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते.
प्रा. निमसे म्हणाले की, २४ सप्टेंबर १९६९ रोजी महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली. प्रारंभी देशातील ३७ विद्यापीठांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा एनएसएसचा प्रमुख उद्देश आहे. बदलत्या काळानुसार तरुणांनी सामाजिक प्रश्न समजून घेऊन त्यावर सकारात्मक कृती करणे गरजेचे आहे.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी ‘Not Me But You’ अर्थात ‘स्वतःपेक्षा समाज प्रथम’ हा एनएसएसचा संदेश विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा, असे आवाहन केले. समाजाचा विचार करून केलेली सेवा हीच खरी मानवता असून, एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना चालना मिळते. श्रमप्रतिष्ठा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, डॉ. घनश्याम भगत, तसेच डॉ. रंजना वर्दे, डॉ. प्रतिभा रांधवणे, डॉ. नामदेव आडमुठे, डॉ. बाळू वाघमोडे, प्रा. रवींद्र कोरे, प्रा. किरण पवार, प्रा. अनिता गोरे, प्रा. तेजस होन, प्रा. प्रसाद हाडोळे यांच्यासह एनएसएसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांचा परिचय एनएसएस कार्यक्रम अधिकारी तथा कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शीतल कदम यांनी केले, तर आभार एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश दिघे यांनी मानले.




