मोठी स्वप्ने पाहा, मेहनतीने ती साकार करा : डॉ. मनाली कोल्हे

मोठी स्वप्ने पाहा, मेहनतीने ती साकार करा : डॉ. मनाली कोल्हे
संजीवनीच्या चित्रकला स्पर्धेत १,४५१ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
Kopargaon vijay kapse दि ५ ऑक्टोबर २०२६–विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक शिक्षक आणि आई-वडील असतात. त्यांचे मार्गदर्शन व अनुभवाचे बोल मनापासून ऐकून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती मेहनतीने साकार करून आई-वडिलांसह शाळेचे नाव मोठे करावे. आजचे युग कृत्रिम बुद्धिमत्ता व वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे बदल स्वीकारून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी विकसित करावी. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसून मेहनतीला पर्याय नाही, असे प्रतिपादन संजीवनीच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी केले.

संजीवनी युनिव्हर्सिटी व संजीवनी वुमन एम्पॉवरमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल १,४५१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. बक्षीस वितरणप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. कोल्हे बोलत होत्या. यावेळी वुमन एम्पॉवरमेंट सेलच्या अध्यक्षा डॉ. सोनाली चिने, उपाध्यक्षा डॉ. अश्विनी जमदाडे, डीन डॉ. सरिता पवार, विभागप्रमुख डॉ. माधुरी जावळे, डॉ. मोहिनी गुंजाळ, प्रा. वृंदा कोऱ्हाळकर, डॉ. शाहीन पठाण आदी उपस्थित होते.

इयत्ता ७ वी ते ८ वी गटासाठी निसर्ग वाचवा, माझी शाळा माझा अभिमान, पाणी आहे तर जीवन आहे, स्वच्छ सुंदर भारत, विज्ञान आणि माझे भविष्य, प्लास्टिकमुक्त भारत व संजीवनी, तर इयत्ता ९ वी ते १२ वी गटासाठी भारत २०४७ : माझ्या स्वप्नातील भारत, कृत्रिम बुद्धिमत्ता : मानवाचा मित्र की भविष्याचे आव्हान?, युवा शक्ती-राष्ट्राची शक्ती, मानवता आणि तंत्रज्ञान, डिजिटल युगातील विद्यार्थी, सायबर सुरक्षितता-सुरक्षित डिजिटल भविष्य व संजीवनी हे विषय देण्यात आले होते.

७ वी ते ८ वी गटात स्वरूप मांढरे (आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल, कोकमठाण) प्रथम, राजनंदिनी शिंदे (न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव) द्वितीय, तर ओजस्विनी नरोडे (विद्याप्रबोधिनी प्रायमरी स्कूल, कोपरगाव) तृतीय आली. सौमया वर्मा, ईश्वरी हांडे, विव्हान मोरे, वेदांती कर्पे व अंजली गुडघे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
९ वी ते १२ वी गटात दर्शना शिंदे (श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल, शिरसगाव) प्रथम, अंकिता रेपाळे (गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालय, कुंभारी) द्वितीय, तर विवेकानंद सुतार (आत्मा मालिक इंग्लिश मीडियम ज्युनिअर कॉलेज, कोकमठाण) आणि तनिष्का परजणे (डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्या मंदिर, कोपरगाव) तृतीय आले. श्रेया भंडारी, प्रणव शिंगारे, तरुणन्नम पिंजारी, स्वरा देशमुख व अलकानंद निरगुडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
दोन्ही गटांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रुपये रोख, मानपत्र व प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ विजेत्यांना ५०० रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात आले. दरम्यान, नितीनदादा कोल्हे यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे व व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकूर यांनी उपक्रमाचे कौतुक केले. स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक मतीन दारूवाला व बाबा सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सीमा गोसावी यांनी केले.
संधी मिळाल्यास ग्रामीण विद्यार्थीही चमकतील
विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक क्षमता व कलागुणांची कमतरता नाही; मात्र हे गुण सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ व संधी मिळणे आवश्यक आहे. स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो. त्यामुळे यश-अपयशाची चिंता न करता प्रत्येक स्पर्धेकडे शिकण्याची व स्वतःला घडविण्याची संधी म्हणून पाहावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, कला, क्रीडा व विविध क्षेत्रांत पुढे नेण्यासाठी संजीवनी सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असे नितीनदादा कोल्हे यांनी सांगितले.



