सर्व सुविधायुक्त बस स्थानक बांधले असते तर संपूर्ण कुटुंबाला पाहणी करण्याची वेळ आली नसती- सुनिल गंगुले
सर्व सुविधायुक्त बस स्थानक बांधले असते तर संपूर्ण कुटुंबाला पाहणी करण्याची वेळ आली नसती- सुनिल गंगुले
चुकीच्या कामावर पांघरूण घालण्यासाठी वारंवार पाहणीचा केविलवाणा प्रयत्न; कोल्हे कुटुंबाची नेहमीच दुटप्पी भूमिका

Kopargaon vijay kapse दि ९ ऑक्टोबर २०२६–कोपरगाव शहरातील बसस्थानक चुकीच्या पद्धतीने बांधल्यामुळे प्रवाशांना आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. या चुकीवर पांघरूण घालण्यासाठी ज्यांनी हे बसस्थानक बांधले, त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तींकडून वारंवार पाहणी करून नागरिकांची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. त्याचवेळी शेजारील तालुक्यांमध्ये बांधण्यात आलेल्या बसस्थानकांप्रमाणे कोपरगाव शहरातही सर्व सुविधायुक्त बसस्थानक उभारले असते, तर आज संपूर्ण कुटुंबाला वारंवार पाहणी करण्याची वेळच आली नसती, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील गंगुले यांनी विधान परिषद सदस्य विवेक कोल्हे यांचेवर नाव न घेता केली आहे.

विधान परिषद सदस्य विवेक कोल्हे यांनी कोपरगाव बसस्थानकाची पाहणी केली. विशेष म्हणजे, अवघ्या आठ दिवसांपूर्वीच माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनीही बसस्थानकाची पाहणी केली होती. कोणतेही विकासकाम करताना त्यातून जनतेच्या अडचणी दूर होणे अपेक्षित असते. मात्र, माजी आमदार कोल्हे यांच्या कार्यकाळात बांधण्यात आलेले बसस्थानकच चुकीच्या पद्धतीने उभारले गेल्यामुळे त्याचा त्रास आज प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या परिस्थितीची त्यांना मनात कुठंतरी खंत वाटत असल्यामुळेच संपूर्ण कुटुंबावर वारंवार पाहणी करण्याची वेळ आली असल्याचे गंगुले यांनी म्हटले आहे.

शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य नागरीकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे कायम प्रयत्नशील आहेत, अडचणी सोडविण्याबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना पण केल्या आहेत. परंतु कोल्हे कुटुंबाने नेहमीच दुटप्पी भूमिका घेतली आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून कोपरगाव बस आगाराला नवीन बसेस मिळाल्या की, त्याचे श्रेय घेण्यासाठी कोल्हे सर्वांत पुढे असतात. मात्र, स्वतःच्या चुकीमुळे असंख्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी ते कधीच पुढे आले नाहीत, अशी टीकाही गंगुले यांनी केली.एकीकडे तीन हजार कोटींच्या विकासकामांबाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे आमदार आशुतोष काळे यांनी आणलेल्या १४ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या बसस्थानक परिसरातील व्यापारी संकुलाची तसेच २८.८४ कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची पाहणी करायची, यातून कोल्हे यांची दुटप्पी भूमिका स्पष्ट होत असल्याचे गंगुले यांनी सांगितले.

‘ए पब्लिक है, सब जानती है!’
ज्यांनी डोळ्यावर पट्टी ओढून घेतली आहे, ज्यांना कोपरगाव मतदार संघात झालेला विकास दिसत नाही. जे वारंवार आमदार आशुतोष काळे यांच्याकडे ३००० कोटीच्या विकासकामांचा हिशोब मागतात तेच आमदार आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेल्या कामांची पाहणी करत आहेत. १४ कोटीचे व्यापारी संकुल आणि २८.८४ कोटीचे उपजिल्हा रुग्णालय हे त्या तीन हजार कोटीच्या निधीतीलच आहे हे पण त्यांना माहिती आहे.
आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाचा विकास केला, हे तुमचे मन पण तुम्हाला सांगत असेल आणि झालेला विकास जनतेबरोबर तुम्ही पण पाहणीच्या नावाखाली स्वत:च्या डोळ्याने पाहत आहात. त्यामुळे कृपा करून यापुढे नागरिकांमध्ये चुकीचा संभ्रम पसरवू स्वत:चे हसे करून घेवू नका,असा टोला लगावत ‘ए पब्लिक है, सब जानती है!’ अशा शब्दांत सुनील गंगुले यांनी विवेक कोल्हे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.



