राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात आत्मा मालिक गुरुकुलच्या नाटकाला प्रथम क्रमांक

राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात आत्मा मालिक गुरुकुलच्या नाटकाला प्रथम क्रमांक
‘अंतराळातील मानवी वस्ती’ नाटकाची विभागीय स्तरावर निवड; विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे सत्कार

Kopargaon vijay kapse दि ११ ऑक्टोबर २०२६ : राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) व जिल्हा परिषदेच्या वतीने अहिल्यानगर येथे आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘अंतराळातील मानवी वस्ती’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. या नाटकाची आता विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तेजस्विनी मोरे, तन्वी शिंदे, समिधा देवरे, शाल्वी कोष्टी, मिताली पाडवी, सात्वित भागवत व आराध्य दिघे यांनी नाटकात प्रभावी भूमिका साकारल्या. त्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ‘अंतराळातील मानवी वस्ती’ हा वेगळा व कल्पक वैज्ञानिक विषय घेऊन नाटक सादर केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका प्रभावीपणे साकारण्यासाठी कसून रंगीत तालीम केली. त्याचेच फलित म्हणून नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला असून, ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे.

या नाटकासाठी आत्मा मालिक सांस्कृतिक विभागाचे व्यवस्थापक आत्मदर्शन बागडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचे गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, प्राचार्य निरंजन डांगे, गटशिक्षणाधिकारी पिंकी वाजे तसेच विज्ञान तालुका अध्यक्ष योगेश सावळा यांनी अभिनंदन केले.



