संजीवनी अकॅडमीमध्ये ‘एरोबे स्किल लॅब’चे उद्घाटन

संजीवनी अकॅडमीमध्ये ‘एरोबे स्किल लॅब’चे उद्घाटन
एरोमॉडेलिंग, रोबोटिक्स व STEM शिक्षणातून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना
Kopargaon vijay kapse दि २८ ऑक्टोबर २०२६: ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संजीवनी अकॅडमीमध्ये अत्याधुनिक ‘एरोबे स्किल लॅब’ सुरू करण्यात आली आहे. या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एरोमॉडेलिंग, रोबोटिक्स तसेच STEM (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथेमॅटिक्स) विषयांचे प्रत्यक्ष अनुभवाधारित प्रशिक्षण मिळणार आहे.

संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष अमित कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून आणि संचालिका डॉ. मनालीताई कोल्हे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम साकारला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, चिकित्सक विचार आणि संशोधनवृत्ती विकसित करण्यासाठी ही लॅब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी या उपक्रमाचे स्वागत करून कौतुक केले.

‘एरोबे स्किल लॅब’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता कृती, प्रात्यक्षिके आणि प्रकल्पाधारित शिक्षणावर भर दिला जाणार आहे. विविध वैज्ञानिक संकल्पना प्रत्यक्ष समजून घेणे, मॉडेल्स तयार करणे, प्रयोग करणे आणि नवनवीन कल्पनांवर आधारित उपाय शोधणे, अशा विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडविण्याची क्षमता, सांघिक कार्य, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास विकसित होण्यास मदत होणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या या उपक्रमाचा उद्देश शिक्षण अधिक रंजक, परस्परसंवादी आणि प्रत्यक्ष उपयोगावर आधारित करणे हा आहे. त्याचबरोबर उदयोन्मुख तंत्रज्ञान, नव्या संधी आणि भविष्यातील करिअरच्या विविध क्षेत्रांशी विद्यार्थ्यांची ओळख करून देण्यात येणार आहे.
संजीवनी अकॅडमी आणि एरोबे यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू झालेल्या या लॅबमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभव आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी ही लॅब निश्चितच उपयुक्त ठरेल.
‘एरोबे लॅब’ ही केवळ शिक्षणाची जागा नसून, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला सर्जनशीलतेची जोड देणारे आणि त्यांच्या कल्पनांना भरारी घेण्यासाठी प्रेरणा देणारे व्यासपीठ ठरणार आहे.
या प्रसंगी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी व उद्योजक युवराज वडजे यांनी लॅबला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. प्रत्यक्ष प्रयोगातून शिकण्याची आणि स्वतःच्या कल्पना साकारण्याची संधी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मिळते, असे त्यांनी सांगितले. तसेच अपयशाची भीती न बाळगता त्यातून शिकत सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
संजीवनी अकॅडमीच्या माजी विद्यार्थिनी अदिती फलटणकर यांनीही लॅबला भेट दिली. शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घेतले जाणारे परिश्रम आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.



