गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे अमृतवाहिनीने अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केला – माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात

ग्रामीण भागातील शिक्षणाचा अमृतवाहिनीचा लौकिक देश – विदेशात पोहोचला
अमृतवाहिनीत ‘ऋणानुबंधाचा स्नेहमेळावा’ उत्साहात संपन्न

Sangmner vijay kapse दि २० नोव्हेंबर २०२६– ग्रामीण भागात असूनही गुणवत्ता आणि उच्च दर्जाचे शिक्षण देण्याची परंपरा अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने सातत्याने जपली आहे. या संस्थेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज देशात आणि परदेशात विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी निर्माण करण्याचे काम अमृतवाहिनीने केले असून भविष्यातही गुणवत्तेचा हा वारसा अधिक सक्षमपणे जपण्यासाठी सर्वांनी सांघिक प्रयत्न करावेत असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा अमृतवाहिनी विद्यापीठाचे कुलपती लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित ‘ऋणानुबंधाचा स्नेहमेळावा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, संस्थेच्या सेक्रेटरी सौ.शरयूताई देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, विश्वस्त विलासराव वर्पे, प्राचार्य प्रा.व्ही.बी.धुमाळ, प्रा. जी.बी.काळे, प्रशासकीय अधिकारी डॉ.संदीप निंबाळकर, प्राचार्य डॉ.प्रसाद बाविस्कर, डॉ.बाबासाहेब लोंढे, डॉ.राजेंद्र वाघ, डॉ.मच्छिंद्र चव्हाण, आशिष कुमार, विलास भाटे, जे.बी.सेठी, अंजली कन्नावार, डॉ.राहुल सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने अमृतवाहिनी शिक्षण संस्थेची उभारणी झाली. आज या संस्थेतील अनेक अभियंते आणि माजी विद्यार्थी देशाच्या विविध भागांत तसेच परदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. संस्थेतील शिक्षण, संस्कार आणि आपुलकीच्या वातावरणामुळे माजी विद्यार्थ्यांचे संस्थेशी असलेले नाते आजही तितकेच घट्ट आहे.
जम्मू – काश्मीरमधील लडाख असो, बिहारमधील पाटणा असो किंवा ऑस्ट्रेलियासारखा देश असो, आपण कुठेही गेलो तरी अमृतवाहिनीचे माजी विद्यार्थी अत्यंत आदराने एकत्र येतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात. हा केवळ माजी विद्यार्थी आणि संस्थेतील संबंध नसून एक भावनिक ऋणानुबंध आहे. संस्थेने त्यांच्या जीवनात निर्माण केलेला आनंद, आत्मविश्वास आणि यशाची संधी यामुळेच हे नाते अधिक दृढ झाले आहे. हा ऋणानुबंध जपत असताना संस्थेची गुणवत्ता हीच आपली खरी ओळख कायम ठेवली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
अमृतवाहिनीने विद्यापीठासह कृषी महाविद्यालय आणि फूड टेक्नॉलॉजीसारखे नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची अमृतवाहिनीला नेहमीच पहिली पसंती मिळत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) विविध क्षेत्रांत मोठी स्पर्धा निर्माण होत असली तरी शेती आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार स्वतःला घडवावे. संस्थेच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीत प्रत्येकाचे सांघिक योगदान महत्त्वाचे राहिले आहे, असेही थोरात यांनी नमूद केले.
मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अमृतवाहिनी संस्थेची निर्मिती झाली. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपला वेगळा लौकिक निर्माण केला आहे. संस्थेने विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच दिले नाही तर त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि योग्य दिशा दिली. त्यामुळे संस्था आणि विद्यार्थ्यांमधील ऋणानुबंध आजही कायम आहेत.
डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, अमृतवाहिनी हा केवळ शिक्षणसंस्थेचा समूह नसून आपला एक मोठा परिवार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडत असते. त्यामुळे बदलत्या काळानुसार नवनवीन संधी निर्माण करताना गुणवत्तेची परंपरा जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. याप्रसंगी दीर्घकाळ शैक्षणिक सेवा बजावणारे प्राचार्य प्रा.व्ही.बी.धुमाळ आणि उपप्राचार्य प्रा. जी.बी.काळे यांचा सेवापूर्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राहुल सातपुते यांनी केले तर डॉ.मच्छिंद्र चव्हाण यांनी आभार मानले.ह.भ.प.विनोद राऊत तसेच अमृतवाहिनी मॉडेल स्कूल आणि इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध अभंगांनी कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण केले. माजी विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेतील पदाधिकारी यांच्या स्नेहपूर्ण उपस्थितीत हा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.




