माजी मंत्री स्व. कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त आयोजित भागवत कथा ध्वजारोहण संपन्न
वेदरूपी कल्पवृक्षाचे परिपक्व फळ म्हणजे भागवत : महंत रामगिरी महाराज
कोपरगाव विजय कापसे दि १३ मार्च २०२४– माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्ट आयोजित श्रीमद् भागवत कथेचे आयोजन प्रथमच कोपरगाव येथे महंत रामगिरीजी महाराज यांच्या अमृत वाणीतून होणार आहे. या प्रसंगी कथेचा ध्वजारोहण समारंभ मठाधिपती महंत रामगीरीजी महाराज यांच्या शुभहस्ते कोपरगाव येथील तहसील कार्यालयाच्या मैदानात मंगळवारी सायं. (दि.१२) संपन्न झाला.
याप्रसंगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प.पु. स्वामी रमेशगिरीजी महाराज, प.पु. श्री. क्षेत्र मंजूर येथील महामंडलेश्वर १००८ शिवानंदगिरीजी महाराज, प.पु. राघवेश्वरनंदगिरीजी उंडे महाराज,आत्मा मलिक ध्यानपीठाचे संत शेलार महाराज,संजीवनी शैक्षणिक संकुलाचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे, गणपत लोहाटे महाराज, संत अशोक महाराज, संत प्रेमानंद महाराज, संत कोंडीबा पठारे महाराज, मधूकर महाराज, गोवर्धनगिरीजी महाराज,राजयोगिनी ब्रह्मकुमारी चैतालीताई, संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.रेणूकाताई कोल्हे, ब्रम्हकुमारी ज्योतीदीदी, आदीसह विविध संतांच्या आणि मान्यवरांसह विविध संस्थांचे चेअरमन, संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते,नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महंत रामगिरीजी महाराज म्हणाले की, आपल्यातील भाव जागृत करून भागवत कथा श्रवण करावी. वेदरूपी कल्प वृक्षाचे परिपक्व फळ म्हणजे भागवत आहे. इतिहास आणि पुराणातील फरक विशद करतांना सांगितले की, इति म्हणजे शेवट आणि काळाने उडविलेली हासी म्हणजे इतिहास आहे. तर पुराण म्हणजे शिक्षा प्रधान वाक्य आहे. यामध्ये ज्ञान आहे, यात विद्वानांची परीक्षा असते. पुन्हा पुन्हा श्रवण करावी अशी वेगळी अनुभूती असते. वेदरूपी परिपक्व फळ आहे. आनंदाचा स्पर्श करावा असा अनुभव आहे. ही कथा फक्त भूलोकातच होत असते.ज्ञान,वैराग्य आणि तप म्हणजे भागवत असे उद्बोधन त्यांनी केले.कोपरगावच्या सामाजिक, सांस्कृतिक विकासात कोल्हे परिवाराचे महत्वपूर्ण योगदान आहेच, त्या पलीकडे जाऊन कोल्हे परिवाराचा आध्यात्मिक क्षेत्रातील आलेख सदैव दैदिप्यमान राहिला आहे, येणाऱ्या पिढीतही हा आलेख उंचावत राहील,असे आशीर्वाद सराला बेटाचे महंत प.पु.रामगिरीजी महाराज यांनी दिले.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे बोलतांना म्हणाले की, स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार होता मात्र दुर्दैवाने साहेब आज हयात नाहीत त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरनाचे औचित्य साधून हा अमृत सोहळा महंत रामगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून होणार आहे.समाजसेवेचे व्रत घेरलेले आमचे कुटुंब आहे.आपत्ती आणि विपदा यात धावून जाण्याचे संस्कार आमच्यावर आहेत.सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवून कोपरगाव मतदार संघाचा विकासाचा दृष्टिकोन आहेच. तो सत्यातही उतरत आहे. या पलीकडे जाऊन आध्यात्मिक विकासासाठी आपल्या परिघाबाहेर जाऊन हे कार्य करावयाचे आहे. ही शिकवण स्व. शंकरराव कोल्हे यांची आहे. कोपरगाव तालुक्यातील धार्मिक क्षेत्रांशी स्व. शंकरराव कोल्हेचं एक वेगळं नातं होते.अतिशय ज्ञानपूर्ण असणारी भागवत कथा ही भाग्याची बाब आहे. या माध्यमातून भागवत कथा श्रवण करण्याची ही एक पर्वणीच आहे. १६ मार्च ते २३ मार्च दरम्यान होणाऱ्या कथेचा श्रवणाचा हजारो भाविक भक्तांनी सहकुटुंब लाभ घ्यावा असे या प्रसंगी श्री.कोल्हे म्हणाले.
या ध्वजारोहण सोहळ्यात प.पु. रमेशगिरीजी महाराज, शिवानंदगिरी महाराज, कोंडीबा महाराज पठारे, जेष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे,माजी सभापती मच्छिन्द्र टेके आदींनी आपले मनोगत व्यक्त केली.
धार्मिक वातावरणात ध्वजारोहण
संगीतमय भागवत कथा सोहळ्याचा ध्वजारोहण समारंभ अत्यंत धार्मिक वातावरणात पार पडला. येणाऱ्या साधू, संतांचे, वाजत गाजत स्वागत केले. तर या सोहळ्यात फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली. अत्यंत धार्मिक आणि विधिवत पद्धतीने ध्वजाचे पूजन करण्यात आले.