सोमवारी कोपरगावचा आठवडे बाजार बंद असेल-मुख्याधिकारी जगताप
शिर्डी लोकसभेकरिता सोमवारी होत आहे मतदान
कोपरगाव विजय कापसे दि ११ मे २०२४– सोमवार दिनांक १३ मे शिर्डी लोकसभा मतदार संघात मतदान असल्याने कोपरगाव शहरात भरणारा सोमवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी दिली आहे.
या विषयी मुख्याधिकारी जगताप यांनी कोपरगाव शहरातील आठवडे बाजारातील भाजी, फळ, किराणा, रेडीमेड, कापडे व इतर अनुषंगिक व्यापारी यांना कळविले आहे की, ३८-शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये सोमवार दि.१३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. सदर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे तसेच निर्विघ्नपणे पार पाडण्याचे दृष्टीने ज्या गावांमध्ये मतदानाचे दिवशी म्हणजे सोमवार दि.१३ मे २०२४ रोजी आठवडे बाजार आहे, अशा ठिकाणचे बाजार बंद ठेवणेकामी मा. उपविभागीय अधिकारी, शिर्डी, भाग शिर्डी यांचे दि.१० मे २०२४ रोजी आदेश प्राप्त झालेले आहे. सदरील आदेशानुसार मतदान प्रक्रिया सुरळीतपणे तसेच निर्विघ्नपणे पार पाडण्याचे दृष्टीने सोमवार दि.१३ मे २०२४ रोजी कोपरगाव शहरात भरत असलेला आठवडे बाजार बंद ठेवण्यात येत आहे, याची सर्व आठवडेबाजार विक्रेते यांनी नोंद घ्यावी असे आवाहन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी केले आहे.