दिव्यांगांचे आशीर्वाद व ग्रामीण भागातील तरुणांच्या सदिच्छा अशोक रोहमारेंना शंभरी पर्यंत घेऊन जातील : ना. विखे

दिव्यांगांचे आशीर्वाद व ग्रामीण भागातील तरुणांच्या सदिच्छा अशोक रोहमारेंना शंभरी पर्यंत घेऊन जातील : ना. विखे
दिव्यांगांचे आशीर्वाद व ग्रामीण भागातील तरुणांच्या सदिच्छा अशोक रोहमारेंना शंभरी पर्यंत घेऊन जातील : ना. विखे

कोपरगाव विजय कापसे दि १९ मार्च २०२६ माझे परमस्नेही अशोकराव रोहमारे (अण्णा) यांचे व विखे परिवाराचे तीन पिढ्यांचे दृढ संबंध आहेत. त्यांचे अभिष्टचिंतन व ग्रंथतुला करण्याचे भाग्य मला लाभले. आज जिकडे-तिकडे शिक्षणाचा बाजार सुरू असताना वैयक्तिक स्वार्थापासून सतत दूर राहणाऱ्या अशोकराव रोहमारे यांनी सोमैया महाविद्यालयाला जिल्ह्यातील एक अग्रगण्य महाविद्यालय करून दाखविले आहे. त्यांच्या या कार्याचा मला आणि विखे परिवाराला अभिमान वाटतो.” असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केले. के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या अशोकराव रोहमारे यांच्या ग्रंथतुला समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी आ. आशुतोष काळे, शालिनीताई विखे, दुर्गाताई तांबे, राजेश परजणे, ॲड. संजीव कुलकर्णी, अभिष्टचिंतन सोहळा समितीचे अध्यक्ष काका कोयटे तसेच रोहमारे परिवारासह विविध मान्यवर उपस्थित होते.

विखे पुढे म्हणाले की, “एकेकाळी एस. एस. जी. एम. महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागत होत्या. प्रवेश मिळाला नाही तरच विद्यार्थी के. जे. सोमैया महाविद्यालयाचा विचार करत. मात्र आता परिस्थिती उलटी झाली आहे. आता प्रथम प्राधान्य सोमैया महाविद्यालयाला आहे. कोचिंग क्लासेस म्हणजे पालकांची लूट असून विद्यार्थ्यांना जीवघेण्या स्पर्धेत ढकलून लाखो रुपये उकळले जात आहेत. सोमैया सारख्या दर्जेदार महाविद्यालयांनी स्वतःचे कोचिंग क्लासेस सुरू करून ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे.”कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा चढता आलेख मांडला.1200 विद्यार्थ्यांपासून 7500 विद्यार्थी ही वाढ केवळ गुणवत्तेमुळे व अण्णांच्या दूरदर्शीपणामुळे झाली आहे हे त्यांनी नम्र पणे नमूद केले. आपल्या मनोगतात त्यांनी रोहमारे परिवार यांचे विखे पाटील परिवार व आमदार आशुतोषजी काळे परिवार यांच्याशी असलेले पिढ्यां-पिढ्यांचे संबंध विशद केले. के. जे. सोमैया महाविद्यालय व मुक बधिर शाळा या दोन्हीं संस्थांची भरभराट होण्यासाठी अण्णांनी जिवापाड मेहनत घेतली व स्वभावाने मायाळू असूनही प्रसंगी ते वज्राप्रमाणे कठीण कसे आहेत ते जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या विविध अभंगांच्या माध्यमातून त्यांनी सांगीतले.

कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. ॲड. संजीवदादा कुलकर्णी यांनी अण्णांच्या स्वभावाचे अनेक पैलू मिश्किल भाषेत उपस्थितांसमोर मांडले. अभिष्टचिंतन समितीचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी आयोजनामागिल भूमिका विशद केली व अण्णा व नामदार विखे पाटील यांच्या सोबत असलेल्या जुन्या संबंधांना उजाळा दिला. अण्णांना शतायुषी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांनी मनोगत पूर्ण केले. याप्रसंगी आमदार आशुतोष दादा काळे यांनीही अशोकराव रोहमारे यांना शुभेच्छा देत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले. तसेच रोहमारे कुटुंबीय व काळे कुटुंबीयांचे ऋणानुबंधांचा उल्लेख करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

समारंभाच्या प्रारंभी सन्माननीय मंत्री महोदय विखे पाटील व आमदार आशुतोष काळे तसेच इतर मान्यवरांच्या शुभहस्ते मानपत्र देऊन तसेच ग्रंथतुला करून अशोकराव रोहमारे यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. अशोकराव रोहमारे, अभिष्टचिंतन सोहळा समितीचे अध्यक्ष मा. काका कोयटे, सदस्य मा. सुधीर डागा, सौ. स्मिताताई रोहमारे, मा. सत्यन मुंदडा, मा. सुजित रोहमारे, ॲड. राहुल रोहमारे, सौ. सारिकाताई रोहमारे, कु. श्रेया रोहमारे, डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. शैलेंद्र बनसोडे, डॉ. रविंद्र जाधव व महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे तसेच महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, कार्यालय अधिक्षक श्री. कोकाटे ए. आर., कर्मचारी श्री. अमृत रोहोम, श्री. संजय पाचोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी स्थापन केलेल्या सर्व समितीतील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी आपापली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली, त्यामुळे कार्यक्रम दिमाखदारपणे पार पडला. 
यावेळी राजेश परजणे, काका कोयटे, ॲड. संजीव कुलकर्णी, प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, कु. श्रेया रोहमारे व कु. स्वरा रोहमारे तसेच अशोक रोहमारे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक संदीप रोहमारे यांनी आभार मानले. डॉ. जिभाऊ मोरे यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. शैलेंद्र बनसोडे व प्रा. अमोल चिने यांनी सूत्रसंचालन केले. समारंभाला कोपरगाव शहर व तालुक्याचे तहसिलदार महेश सावंत, शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालय विकास कमिटीचे सर्व पदाधिकारी, मा. रावसाहेब रोहमारे, अॅड. राहुल रोहमारे आदी रोहमारे कुटुंबीय, आप्तेष्ट, तसेच संस्था व महाविद्यालयाचे आजी-माजी प्राध्यापक व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी अशोकराव रोहमारे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.



